नागपूर : ‘आपले अन्न आपणच तपासा’, या प्रकारचे प्रशिक्षण शिबिर व अभिनव कार्यशाळा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आणि अॅनाकॉन लॅबच्या सहकार्याने हॉटेल व मिठाई व्यावसायिकांसाठी बुटीबोरी येथे घेण्यात आली.यावेळी अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शिवाजी देसाई, अॅनाकॉन लॅबचा संचालिका डॉ. श्री व श्रीमती गार्वे आणि हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष भवानीशंकर दिवे यांनी मार्गदर्शन केले. देसाई यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या तरतुदींची माहिती दिली. हॉटेल व्यावसायिक विविध प्रकारचे पदार्थ तयार करतात. पण ज्या कच्च्या अन्न पदार्थांपासून करतात, त्या अन्न पदार्थाचा दर्जा योग्य आहे की नाही, याच्या तपासणीसाठी कोणतेही साधन उपलब्ध नसतात. दुग्ध, दुग्धजन्य पदार्थ, मसाले, खाद्यतेल, चांदीचा वर्ख आदी जागेवरच कसे तपासले जाईल, याबाबत सर्व व्यावसायिकांना अॅनाकॉन लॅबच्या संचालिका डॉ. गार्वे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. सदर तपासणीमुळे हॉटेल व्यावसायिक हे स्वत:च जागेवर त्यांनी तयार केलेले अन्न पदार्थ तपासू शकतात व पर्यायाने जनतेस निर्भेळ व सुरक्षित अन्न मिळू शकेल. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल्स, मिठाई व खवा विक्रेत्यांची बैठक शिवाजी देसाई यांनी पूर्वीच घेतली होती. त्यावेळी जागेवरच तपासणीसंदर्भात प्रशिक्षण देण्याविषयी व्यापाऱ्यांनी मागणी केली होती. कार्यशाळेची संकल्पना देसाई यांनी हॉटेल व्यावसायिकांसमोर मांडली होती आणि अॅनाकॉन लॅबच्या सहकार्याने अमलात आणली. हॉटेल व्यावसायिकांनी या उपक्रमासाठी अन्न व औषध प्रशासन आणि अॅनाकॉन लॅबचे आभार मानले.हॉटेल असोसिएशनचे सचिव जोशी, सहायक आयुक्त (अन्न) एम.सी. पवार, अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे, संजय बोयेवार, प्र.अ. उमप, जी.के. बसवे व एस.एस. देशपांडे आणि हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आपले अन्न आपणच तपासा!
By admin | Published: October 04, 2015 3:25 AM