नागपूर : स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला नागपुरात रविवारी एक आगळीच झळाळी मिळाली. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ७५ प्रकारांच्या तांदळापासून ७५ भाताचे प्रकार अर्थात व्यंजन करण्याचा विक्रम केला. हा त्यांचा १२ वा विक्रम होता. विशेष म्हणजे, पाच तासाच्या आतच ७५ प्रकारच्या ३७५ किलो भाताचे पदार्थ या वेळात तयार करण्यात आले.
हा वर्ल्ड रेकॉर्ड ते पाच तासात पूर्ण करणार होते, परंतु त्यांनी तो वेळेच्या आधी पूर्ण केला. सकाळी ९.१५ वाजता या वर्ल्ड रेकॉर्डला सुरुवात झाली आणि दुपारी ठीक २ वाजता त्यांनी तो पूर्ण केला. या उपक्रमाच्या निमित्ताने ७५ तांदळाचे प्रकार आणि त्यापासून बनलेले ७५ भाताच्या पदार्थांचे प्रकार यांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. यावेळी शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
देशाच्या स्वातंत्राला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त हा उपक्रम विष्णूजी की रसोई येथे घेण्यात आला. या उपक्रमासाठी त्यांनी प्रत्येक भात जवळपास ५ किलो तयार केला होता. उपस्थित नागपूरकर खवय्यांनी या निमित्ताने अनेक दुर्मीळ प्रकारच्या तांदळांची रेसीपी खाण्याचा नि:शुल्क आनंद लुटला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सानवी जेठवणी यांनी केले.
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या या वर्ल्ड रेकार्डचे औचित्य साधून स्थानिक गायकांनी देशभक्तीपर गाणी गायली. यावेळी विष्णू यांचे खाद्य जगतातील योगदान आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगड घालत विजय जथे यांच्या शेतातील वाणाला ‘विष्णुअमृत’ हे नाव देण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आर. विमला, के.व्ही.आय.सी.चे संचालक जयप्रकाश गुप्ता, नागपूर कारागृहाच्या पोलीस उपमहानिरीक्षक साठे, चंद्रपूर कारागृहाचे अधीक्षक आगे, नागपूर कारागृहाच्या उपनिरीक्षक दीपाली आगे, दक्षिण मध्य सांस्कृतिक क्षेत्राचे संचालक खिरवडकर, दिनेश मित्तल यांची विशेष उपस्थिती होती. मैत्री परिवार संस्थेचे संजय भेंडे, चंदू पेंडके, जयप्रकाश गुप्ता यांच्यासह अनेकांनी या उपक्रमाला भेट दिली.
पहिलाचा उपक्रम
विष्णू मनोहर यांनी तांदळासंदर्भात घेतलेला हा पहिलाच मोठा उपक्रम होता. ७५ प्रकारच्या तांदळाचे वाण गोळा करण्यासाठी त्यांना लातूरचे व्यावसायिक दिनेश मित्तल (मित्तल राईस वर्ल्ड) यांनी सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान या सर्व ७५ तांदळाचे नाव, जात, प्रदेश आणि यापासून कुठला पदार्थ तयार होत आहे यांची विस्तृत माहिती उपस्थितांना देण्यात आली.