लाेकमत न्यूज नेटवर्क
टाकळघाट : बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी लगतच्या नदी-नाल्यांमध्ये साेडले जाते. काही कंपन्या या रसायनयुक्त पाण्याची याेग्य विल्हेवाट लावण्यासाठी टॅंकरचा वापर करतात. त्यातच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी टाकळघाट (ता. हिंगणा) फाट्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये रसायनयुक्त पाण्याची वाहतूक करणारे दाेन टॅंकर ताब्यात घेतले आहे. पाणी तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती ठाणेदार विनाेद ठाकरे यांनी दिली. ही कारवाई साेमवारी (दि. २८) रात्री ८.५० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
आरजे-०९/जीसी-२३१७ आणि एमएच-४०/४३९१ क्रमांकाच्या टॅंकरमध्ये रसायनयुक्त पाण्याची वाहतूक केली जात असून, ते पाणी नाल्यात साेडले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी टाकळघाट फाट्याजवळील धाब्याजवळ दाेन्ही टॅंकर थांबवून तपासणी केली. यात त्यांना दाेन्ही टॅंकरमध्ये रसायनयुक्त पाणी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी दाेन्ही टॅंकर ताब्यात घेत पाेलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात तूर्तास गुन्ह्याची नाेंद करण्यात आली नाही.
....
या टॅंकरमधील पाण्यात घातक रसायन मिसळले असल्याचे स्पष्ट दिसून येत असून, तसा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. या पाण्याचे नमुने नागपूर शहरातील प्रयाेगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- आनंद काटोले, उप प्रादेशिक अधिकारी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर
...
महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून दाेन्ही टॅंकर ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या चालकांना बाेलावून चाैकशी केली जाईल. पाणी तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- विनाेद ठाकरे, ठाणेदार
एमआयडीसी बुटीबाेरी, पाेलीस ठाणे