नागपूर : पुण्याहून लखनौला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची तब्येत अचानक बिघडल्याने विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यानंतर प्रवाशाला उपचारासाठी स्थानिक किम्स-किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहम्मद अहमद अन्सारी (२६), असे या तरुणाचे नाव आहे.
मोहम्मद हे इंडिगो फ्लाइट क्रमांक ६ई ३३८ मध्ये पुण्याहून लखनौला जात होते. प्रवासादरम्यान त्यांना छातीत दुखू लागले. या घटनेची माहिती वैमानिकाला तातडीने देण्यात आली. वैमानिकाने नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. विमान उतरताच त्यांना थेट रुग्णालयात नेण्यात आले. सध्या हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गंजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती तरुणाच्या कुटुंबीयांना देण्यात आल्याचे हॉस्पिटलचे डीजीएम (कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी सांगितले.
अहमद पुण्यातील एका कारखान्यात काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी त्यांना छातीत दुखत होते. ते तेथील डॉक्टरांना भेटायला गेले. तेव्हा ईसीजीमध्ये बदल दिसून आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यांनी पुण्याऐवजी लखनौला उपचार घेण्याचा निर्णय घेतला. विमानात त्यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या. याबाबत माहिती मिळताच शनिवारी सकाळी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि विमानतळावर उपस्थित वैद्यकीय पथकाने रुग्णाची तपासणी केली. यानंतर सकाळी ६ वाजता त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना इंजेक्शन, औषधे दिली आणि अँजिओग्राफी करण्यात आली. अँजिओग्राफी नॉर्मल असून तरुणाची प्रकृती स्थिर आहे. अहमद यांचे कुटुंबीय रविवार सकाळपर्यंत नागपुरात येणार असून त्यानंतरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे डॉ. शैलेंद्र गंजेवार यांनी सांगितले.