मांढळमध्ये आमदंगल : ३० हजारांहून अधिक शौकिनांची उपस्थितीकुही : पांडव पंचमीनिमित्त मांढळ येथील भोलाहुडकी या गोलाकार नैसर्गिक आखाडावजा स्टेडियममध्ये कुस्त्यांची आमदंगल झाली. त्यात २० वर्षे वयोगटात चेतन मुंडले, २५ वर्षे वयोगटात चिचाळा (ता. रामटेक)च्या दिनेशने बाजी मारली. या आमदंगलीत शेकडो पहेलवान सहभागी झाले होते. विजेत्या पहेलवानांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.कुस्त्यांच्या आमदंगलीचे उद्घाटन खा. कृपाल तुमाने यांच्या हस्ते करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राजू पारवे, भागेश्वर फेंडर, संदीप इटकेलवार, देवीदास तिरपुडे, सुनील जुवार, पांडुरंग बुराडे, संजय निरगुडकर, स्वप्नील राऊत, राजू राऊत, सुनील डहारे, रोशन सोनकुसरे, संजय मेश्राम, राजेश तिवसकर, राजानंद कावळे, राजेश कांबळे, नरेश राऊत, आशिष आवळे, महेश बांते, गौतम भोयर, प्रकाश पोटफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी खा. तुमाने यांनी स्टेडियमच्या विकासाकरिता पाच लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. आमदंगल पाहण्यासाठी जवळपास ३० हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे, २५ वर्षे वयोगटात गतवर्षी विजेत्या औरंगाबादच्या श्रीकांत पाजाळे याचा चिचाळ्याच्या दिनेशने पराभव केला. पंच म्हणून झिंगर दुधपचारे, मनिराम डहारे, रुपचंद फोपसे, महादेव कडुकार, गोमन गोटाफोडे यांनी जबाबदारी पार पाडली. राजू पारवे यांच्या हस्ते विजेत्या - उपविजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक आखाडा समितीचे अध्यक्ष प्रभाकर राऊत यांनी केले. संचालन मधुकर फोपसे यांनी केले. आमदंगलीनिमित्त ‘सजना मी डाव जिंकला’ हे नाटक, खडा तमाशा, लावणी, गोंधळ आदीचे आयोजन करण्यात आले होते. आमदंगलींची मुहूर्तमेढपांडव पंचमीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या कुस्त्यांच्या आमदंगलीची मुहूर्तमेढ १९६५ मध्ये स्व. डोमाजी राऊत पाटील यांनी रोखली. ते कुुस्त्यांचे शौकीन होते. त्यानंतर दरवर्षी या ठिकाणी पांडव पंचमीला कुस्त्यांचा आखाडा भरू लागला. या कुस्त्यांमध्ये पहिलवानांचे वजन अथवा वयाप्रमाणे गट पाडले जात नाही. या आमदंगलीमध्ये सहभागी होणारा पहिलवान त्याच्या मार्जीने त्याच्या पात्रतेचा दुसरा पहिलवान निवडतात. ही जोडी आयोजन समितीकडे जाते. पुढे या दोघांची कुस्ती होते. सोबतच येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि दांडपट्ट्याचेही आयोजन केले जाते. त्यात मुलांसोबतच मुलीही सहभागी होऊन कौशल्य दाखवितात. (तालुका वार्ताहर)ऐतिहासिक पार्श्वभूमीचौदाव्या शतकांत विदर्भामध्ये वाकाटकांचे राज्य होते. नंदीवर्धन हे त्यांचे राजधानीचे ठिकाण होते. वाकाटक राजांना ज्यावेळी पवनीच्या पवनराजांची भेट घ्यायची असे, त्यावेळी ते नंदीवर्धन येथून भिवकुंड (चापेगडी टेकड्या) मार्गे अडमच्या किल्ल्यात यायचे. पुरातत्त्व विभागाने १२ वर्षांपूर्वी या किल्ल्यात खोदकाम केले. त्यात बुद्धकालीन अवशेष सापडल्याचे जाणकार सांगतात. वाकाटक राजे अडमच्या किल्ल्यातून भोला हुडकीच्या किल्ल्यात यायचे. येथे ते विश्राम करायचे. येथून ते पुल्लरच्या जंगलातील बाराखोली मार्गे पवनीला जायचे, असा उल्लेख ‘वैदर्भी उत्खननाचा इतिहास’मध्ये केला आहे. भोला हुडकी येथील प्राचीन व नैसगिक हौदाचे रूपांतर कालांतराने स्टेडियममध्ये झाले.
खरबीचा चेतन पहेलवान अव्वल
By admin | Published: October 30, 2014 12:49 AM