नागपूर : मी अनेक वर्षे राजकारणात आहे. मात्र, कधीही कुणी राज्यपालांचा अपमान केल्याचे पाहिले नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने महाराष्ट्र राज्य व येथील महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेची मने दुखावली आहेत. यातूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केले. नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यपालांची वक्तव्ये ही चुकीचीच होती. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबतीत त्यांनी जी वक्तव्ये केली, यावरून भाजप नेत्यांमध्येदेखील निश्चितच संताप आहे. मात्र, ते बोलू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले.
बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर यासाठी अनेकांनी बलिदान दिले. ते लोक अगोदर परत द्यावे; नंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावादावर बोलावे. ६२ वर्षांपासून सीमाप्रश्नावर आंदोलन सुरू आहे. बेळगावच्या लोकांनी कित्येक वेळा महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकप्रतिनिधी निवडून दिले. ते तेथील मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का, असा सवाल भुजबळ यांनी केला.
ओबीसींना २७ टक्के आरक्षणदेखील नाही
मागील मनपा निवडणुकांत प्रभाग रचनेच्या अगोदर खूप चर्चा झाल्या होत्या. प्रभाग रचनेत वारंवार बदल घडविण्यात येत आहे, हे आश्चर्यजनक आहे. लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेल्या ओबीसींना २७ टक्के आरक्षण मिळत नाही. हा वाद कायमचा संपुष्टात आणला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले.