विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. त्यांनी ठाकरे गटाकडून वारंवार होत असलेल्या टीकांचा खरपून समाचार घेतला. यानंतर विरीध पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी पवारांनी शिंदेंना मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांची आठवण करुन दिली. तसेच, शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही अजित पवार यांनी केली. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा पाठही शिकवला. तसेच, छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्यरक्षक होते, असेही ठणकावून सांगितले.
विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी बाल शौर्य पुरस्काराची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून भाषण केलं. आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. पण, काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर... धर्मवीर... उल्लेख करतात, मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना म्हटले.
महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जपली पाहिजे
''मागच्या काळामध्ये झालं.. झालं गेलं गंगेला मिळालं. उकिरडा कितीही उकरला तरी त्यातून काही निघणार नाही...तेच तेच सांगत बसण्यापेक्षा. आपण, ''राज्याच्या 13 कोटी जनतेचे प्रमुख आहात. मुख्यमंत्री आहात. देशाच्या राजकारणात दोन नंबरचं पद महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती, परंपरा. ती जपली पाहिजे, वाढवली पाहिजे. त्याची जबाबदारी शिंदे साहेब तुमच्यावर आहे. पुन्हा विचार करा. आपण आपलं चालत राहायचं, बोलणारे बोलत असतात. जनता व्यवस्थित समजून घेते,'' असेही पवार म्हणाले.
सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी - पवार
हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, विदर्भाच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली. आम्ही सभागृहात मंत्र्यांच्या विरोधात घोटाळ्यांचे पुरावे दिले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सभागृहात आणि बाहेरही संघर्ष केला; पण निर्लज्ज सरकारने याची साधी दखलही घेतली नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी अंतिम आठवडा प्रस्तावातून सरकारचे लक्ष वेधले; परंतु सरकारने चकार शब्दही काढले नाही. सीमावादावर सत्ताधाऱ्यांकडून कडक संदेश देणारा प्रस्ताव आला नाही. पावसाळी व हिवाळी अधिवेशनात ७८ हजार कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या मंजूर केल्या. हा प्रकार म्हणजे सरकारची आर्थिक शिस्त बिघडविण्याचा प्रकार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.