नागपूर : मराठा आरक्षण व समाजाच्या विविध समस्यांबाबत खासदार छत्रपती संभाजीराजे हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांचा जनसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्यभरात दौरा करीत आहेत. सोमवारी ते नागपूरमध्ये येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे विदर्भातील सकल मराठा समाजात नवचैतन्य पसरले आहे. जनसंवाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाजातील नागपूरच्या प्रमुख लोकांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सकल मराठा समाज नागपूरच्या संयोजक, सहसंयोजक व इतरांसोबतच छत्तीसगढ राज्यातील धमतरी राजघराण्यातील दिग्विजयसिंह घाडगे किर्दत्त उपस्थित होते.
विदर्भातील सकल मराठा समाजातर्फे सकाळी ११.३० वाजता महाल येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मालार्पण व अभिवादन करून जनसंवाद बैठक सुरू होईल. यावेळी ते समाजाशी संवाद साधतील, यावेळी सकल मराठा समाज विदर्भाचे मुख्य संयोजक राजे मुधोजी भोसले व राजे संग्रामसिंह भोसले प्रामुख्याने उपस्थित राहतील. यानंतर पत्रकारांशीही त्यांचा संवाद होईल. या जनसंवाद बैठकीला विदर्भातील समस्त मराठा बंधू भगिनींनी स्थानिक प्रशासनाने सुचविलेल्या कोविड १९च्या नियमांचे पालन करीत उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.