लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुस्लीमबहुल भाग असलेल्या मोमीनपुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यासाठी मुस्लीम समाजानेच पुढाकार घेतला आहे. यानिमित्त ऑल इंडिया एकता फोरमतर्फे येत्या २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता मोमीनपुरा येथील मुस्लीम ग्राऊंडवर मराठा, ओबीसी, शीख आणि मुस्लीम समाजाचे ऐतिहासिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया एकता फोरम महाराष्ट्राचे प्रभारी मुफ्ती जुबेर कासमी राहतील. तर गुरुद्वारा प्रबंध कमिटीचे मलकीत सिंह बल आणि संभाजी ब्रिगेडचे राज्य नेते दिलीप चौधरी प्रमुख वक्ते राहतील. फोरमचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद शाहीद यांनी सोमवारी पत्रपरिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान राजे होते. परंतु आजपासून १० ते १५ वर्षांपूर्वीपर्यंत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत चुकीचा इतिहास सांगितला गेला. त्यामुळे जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यायची सर्वसामान्य मुस्लीम समाजामध्ये एकप्रकारचे भीतीचे वातावरण राहायचे. परंतु हळूहळू जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वाचले, माहिती करून घेतली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सर्व समाजाचे कसे होते हे समजले. परंतु ही माहिती केवळ शिक्षित आणि बुद्धिजीवी लोकांपर्यंतच आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वसामान्य मुस्लीम समाजापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मोमीनपुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.पत्रपरिषदेला ऑल इंडिया एकता फोरमचे हाफीज मो. अशरफ, हाफीज रिजवान, हाफीज शमसुद्दीन, मो. आदिल आदी उपस्थित होते.
नागपुरातील मोमीनपुऱ्यात होणार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 8:37 PM
मुस्लीमबहुल भाग असलेल्या मोमीनपुरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यासाठी मुस्लीम समाजानेच पुढाकार घेतला आहे.
ठळक मुद्देमुस्लीम समाजाचा पुढाकार : मराठा, ओबीसी, शीख आणि मुस्लीम समाजाचे संमेलन