लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनकल्याणाकरिता आयुष्यभर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी समाजाकरिता संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांचे योगदान कधीच विसरल्या जाऊ शकत नाही, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी व्यक्त केले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे कर्मचारी, सरकारी वकील कार्यालय, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर व डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी या तिन्ही महापुरुषांच्या जयंतीचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. न्यायमूर्ती विनय देशपांडे, असिस्टंट सॉलिसिटर जनरल अॅड. उल्हास औरंगाबादकर, मुख्य सरकारी वकील अॅड. सुमंत देवपुजारी, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, हायकोर्ट वेलफेयर कमिटीचे अध्यक्ष अॅड. शैलेश नारनवरे व हायकोर्ट मिनिस्टेरियल ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष व्ही. बी. फरकाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तिन्ही महापुरुषांची दूरदृष्टी आश्चर्यकारक होती. त्यांनी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले. त्यांनी निर्माण केलेला आदर्श येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. आपणही या महापुरुषांचे विचार अंगिकारून त्यानुसार वाटचाल केली पाहिजे, असे न्या. शुक्रे यांनी पुढे बोलताना सांगितले.तिन्ही महापुरुषांमध्ये दोन गोष्टी समान होत्या. त्यांनी गुलामगिरीची बंधने झुगारली व स्त्रियांचा आदर करणे शिकविले, असे मत न्या. देशपांडे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, महात्मा फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे मोकळी करून दिली तर, बाबासाहेबांनी या देशाला बळकट लोकशाही दिली, असे अॅड. किलोर यांनी सांगितले.तिन्ही महापुरुषांनी जीवनभर समाजातील कमजोर वर्गाला न्याय देण्याचे कार्य केले. हे कार्य करीत असताना त्यांनी परिणामांची तमा बाळगली नाही, अशा भावना अॅड. देवपुजारी यांनी व्यक्त केल्या. हे तिन्ही महापुरुष महाराष्ट्राचे सुपुत्र असून, आज त्यांचे नाव संपूर्ण जगात घेतले जाते. त्यांनी देशाचे राजकारण व समाजकारणाला दिशा दिली, असे अॅड. औरंगाबादकर यांनी सांगितले. फरकाडे यांनी स्वागतपर मार्गदर्शन, अॅड. शैलेश नारनवरे यांनी प्रास्ताविक, हर्षा पाटील यांनी संचालन तर, दीप्ती दावडा यांनी आभार व्यक्त केले.अॅड. शैलेश नारनवरे यांची जनसेवातिन्ही महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून जनसेवा करण्याचा संकल्प अॅड. शैलेश नारनवरे यांनी यावर्षीही पाळला. त्यांनी वडील रामाजी व आई जिजाबाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उच्च न्यायालयातील पक्षकारांसाठी १२ स्टील बेंचेस आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ३० स्टील खुर्च्या भेट दिल्या. यापूर्वी त्यांनी उच्च न्यायालयातील पोलीस चौकीला वॉटर कूलर भेट दिले होते. याशिवायही ते विविध प्रकारचे सामाजिक कार्य करीत राहतात.