नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मजुरीचा हिशेब रोखल्यामुळे एका मजूर दाम्पत्याने शेतमालकाच्या साळीच्या १२ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण केले. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी पहाटे ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
फिर्यादी शेतमालकाची शेती कळमेश्वर तालुक्यातील लोणारा शिवारात आहे. शेतात बांधलेल्या घरातच शेतमालक, त्यांची मेव्हणी आणि तिचा १२ वर्षांचा मुलगा राहतो. छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील सोनू आणि त्याची पत्नी गीता हे दोघे ८ महिन्यांपूर्वी शेतमालकाकडे मजूर म्हणून कामावर लागले. तेसुद्धा शेत शिवारातच राहत होते. अलिकडे काही दिवसांपासून शेतमालकाने मजुरीची रक्कम अडवून धरल्याने शेतमांलकासोबत सोनूचा वाद सुरू होता. दिवाळीसारखा सण असूनही शेतमालकाने आपल्या कामाचे पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या सोनू आणि त्याच्या पत्नीने शनिवारी सकाळी ५.३० च्या सुमारास शेतमालकाचे दार ठोठावले. दारा उघडताच सोनू, गिता आणि शेतमालकाचा पैसे अडवून धरल्याच्या कारणावरून जोरदार वाद झाला. तो कसाबसा शांत झाल्यानंतर ते सर्व आपापल्या कामात गुंतले.
काही वेळाने शेतमालकाच्या साळीचा १२ वर्षांचा मुलगा दिसत नसल्याने शेतमालकाने शोधाशोध सुरू केली. शेतमजूर सोनू आणि त्याची पत्नीही गायब होती. त्यानंतर घरात खताच्या चुंगडीत (पोत्यात) लपवून ठेवलेले २५ हजार रुपये आणि मोटरसायकल तसेच मोबाईलसुद्धा गायब असल्याचे लक्षात आल्याने हादरलेल्या शेतमालकाने कळमेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सोनू आणि गीताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एपीआय दिलीप पोटभरे प्रकरणाचा तपास करीत आहेत.सोनूने विकलेला मोबाईल जप्त
शेतमालकाने सोनूला कामावर ठेवल्यानंतर त्याला एक मोबाईल विकत घेऊन दिला होता. मात्र, मजुरीचे पैसे अडवून धरल्याने आरोपी सोनू आर्थिक कोंडीत सापडला होता. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी सोनूने शेतमालकाने घेऊन दिलेला मोबाईल विकला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल ट्रेस केला असता तो एका व्यक्तीकडे आढळला. पुढच्या चाैकशीत अपहरणाचा गुन्हा करण्यापूर्वीच सोनूने तो त्या व्यक्तीला विकला होता, हे उघडकीस आले.आरोपीची शोधाशोध, चार पथके चार भागात रवाना
चिमुकल्याचे अपहरण होऊन आता ७२ तासांपेक्षा जास्त अवधी झाला आहे. मात्र, अद्याप आरोपीचा छडा लावण्यात आणि अपहृत चिमुकल्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दरम्यान, आरोपींचा हुकडून त्यांच्या ताब्यातील चिमुकल्याची सुटका करण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी चार वेगवेगळी पोलीस पथके चार भागात रवाना करण्यात आली असून, ती आरोपी दाम्पत्याचा शोध घेत आहेत.