कीटकनाशकाच्या पुड्या आढळल्या -
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - मोठ्या पदाची नोकरी अन् उच्चभ्रू नातेवाईकांचा गोतावळा असलेल्या राजेशकुमार श्रीवास्तव यांनी प्रशासकीय तणावामुळेच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. दरम्यान, आज त्यांचे नातेवाईक नागपुरात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्यांना राजेशकुमार यांचा मृतदेह सोपविला.
छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालक असलेले राजेशकुमार श्रीवास्तव गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणावात होते. बिलासपूरहून मनाविरुद्ध रायपूरला बदली झाल्यानंतर त्यांनी कोर्टातही दाद मागितली होती. या घडामोडीपासून ते डिप्रेशनमध्ये गेल्याने कुटुंबीय त्यांना दिलासा देत होते. सध्या छत्तीसगड सरकारचे रायपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशन असल्याने त्यांचे वाहन सरकारी यंत्रणेकडे जमा करण्यात आले होते. त्यामुळे खासगी वाहनानेच ते आपल्या कार्यालयात जात होते. १ मार्चला सकाळी ११ वाजता ते कार्यालयात पोहचले. नंतर ते बेपत्ता झाले. दुपारी १२. ३०पर्यंत ते रायपुरातच होते. नंतर मात्र त्यांचा मोबाईलही बंद असल्यामुळे घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. श्रीवास्तव उच्चपदस्थ अधिकारी असल्याने आणि अचानक ते बेपत्ता झाल्याने पोलीस यंत्रणा त्यांना शोधण्यासाठी कामी लागली. परंतू त्यांचा छडा लागू शकला नाही. अचानक बुधवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांना पूजा लॉजमधून फोन आला. रूम नंबर १०४ मध्ये थांबलेल्या पाहुण्याकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याचे लॉजमधून सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस पथक तेथे पोहचले. दार तोडून आतमध्ये शिरलेल्या पोलिसांना संबंधित व्यक्ती मृतावस्थेत आढळली. त्यांच्याकडे मोबाईल, दागिने, रोख रक्कम तसेच आधारकार्ड आढळले. लॉजच्या रजिस्टरमध्ये त्यांनी जो मोबाईल नंबर नोंदवला होता, त्यावर पोलिसांनी संपर्क केला असता मृत व्यक्ती राजेशकुमार श्रीवास्तव असून ते छत्तीसगडमधील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचेही स्पष्ट झाले. श्रीवास्तव यांच्या उशीत कीटकनाशकाच्या तीन पुड्या आढळल्या. त्यातील एक रिकामी होती. ती खाऊनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज काढत नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह मेडिकलला रवाना केला.
दरम्यान, गुरुवारी सकाळी श्रीवास्तव यांचे नातेवाईक नागपुरात पोहचले. राजेशकुमार यांचा मुलगा सीए असून लॉ करीत आहे. मुलगी डॉक्टर आहे तर भाऊ चंद्रपुरात वेकोलित उच्चाधिकारी आहे. त्यांचा मेव्हणा उपजिल्हाधिकारी आहे. सुसाईड नोट वगैरे आढळली नसल्याने आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनिस यांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी प्रशासकीय ताणतणावामुळे ते डिप्रेशनमध्ये होते, असे सांगितले. श्रीवास्तव कुटुंबीय शोकविव्हळ असल्याने पुढे काही विचारणे सांगणे झाले नाही. पोलिसांनी त्यांना राजेशकुमार यांचा मृतदेह सोपविला.
---
२ मार्चला पोहचले नागपुरात
१ मार्चला दुपारी रायपुरातून बेपत्ता झालेले श्रीवास्तव २ मार्चला सकाळी १० वाजता नागपुरात पोहचले. बुधवारी सकाळी ते लॉजमधून काही वेळेसाठी बाहेर गेले होते. परतल्यानंतर मात्र त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही. नंतर सायंकाळी त्यांचा मृतदेहच लॉज व्यवस्थापक आणि पोलिसांना मिळाला. १ मार्चला बेपत्ता झाल्यापासून तो कीटकनाशक घेण्यापर्यंत श्रीवास्तव यांनी कुणाशी संपर्क केला, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
----