अमरावती : चोरीचे वाहन विकून फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या शोधात छत्तीसगढ राज्याचे पोलीस रविवारी अमरावतीत दाखल झाले होते. नागपुरी गेट पोलिसांच्या मदतीने त्यांनी मसानगंज परिसरात आरोपीची झाडाझडती घेतली. मात्र, रित्या हाताने त्यांना परतावे लागले.
चोरीचे वाहन विकून फसवणूक केल्याचे प्रकरण छत्तीसगढ येथील खुर्सीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. भादंविच्या कलम 420 व 406 अन्वये नोंद असलेल्या या गुन्ह्याचे धागेदारे अमरावतीशी जुळल्याची माहिती खुर्सीपार पोलिसांना मिळाली होती. तेथे पकडलेल्या आरोपीने अमरावतीच्या नागपुरी गेट हद्दीतील शेख रफीक वल्द दिलावर (30, रा. मसानगंज) याचे नाव पोलिसांना सांगितले. त्याच्या शोधात खुर्सीपार ठाण्याचे एएसआय जी.एन. चौधरी, पोलीस कर्मचारी अजयसिंह, प्रकाशचंद्र तिवारी यांचे पथक रविवारी अमरावतीत दाखल झाले. पीआरवर ताब्यात घेतलेला एक आरोपीसुद्धा पोलिसांनी सोबत आणला होता. नागपुरी गेट ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश खुळे यांच्यासोबत मसानगंज परिसरात जाऊन आरोपीच्या घराचा शोध घेतला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. खुर्सीपार ठाण्याच्या पोलिसांनी सोबत आणलेल्या आरोपीची जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला घेऊन पुन्हा छत्तीसगढ रवाना झाले. याबाबतची नोंद नागपुरी गेट पोलिसांनी घेतली आहे.
चोरीच्या वाहनविक्रीचे रॅकेट
वाहने चोरून ती परराज्यात विकणारी टोळी शहरात सक्रिय असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत ट्रक चोरल्यानंतर त्याची सुट्या भागात विक्री केल्याचे उघड झाले होते. हे रॅकेट महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही सक्रिय आहे. अशा गुन्ह्यांतील आरोपींच्या शोधात परराज्यातील पोलीस अमरावतीत अनेकदा दाखल झाले आहेत.