नागपूर : आजवर तुम्ही अनेक पाळीव प्राण्यांचे वाढदिवस अगदी उत्साहात साजरे केल्याचे बघितले असतील पण, कोंबड्याच्या वाढदिवस साजरा झाल्याचे तुम्ही ऐकले नसेल. होय, चक्क कोंबड्याचा वाढदिवस तो ही अगदी थाटात! सध्या या कोंबड्याचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरलाय...
उमरेड येथील कागदेलवार कुटुंबातील सुरभीला एका वर्षाआधी हे कोंबडीचे पिल्लू जखमी अवस्थेत सापडले. तिने ते घरी आणले व उपचार केले. हळू-हळू हा कोंबडा कागदेलवार कुटुंबाचा सदस्यच बनला, आज ते पिल्लू त्यांच्या घरी येऊन एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमीत्ताने कुटुंबियांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आणि अगदी थाटात असा हा कार्यक्रम पार पडला.
या कोंबड्याचे नाव कुचा असे आहे. लहानपणी तो कूच-कूच असा आवाज करत असल्यामुळे घरच्यांनी त्याचे नाव कुचा असे ठेवले. घरातील सर्वच सदस्य त्याची जीवापाड जपणूक करतात. घरच्यांचा लाडका कोंबडा आता बराच मोठा झाला असून अगदी सफेद पंख लाल डोक्यावर असलेल्या लालेलाल तुऱ्याने अगदी रुबाबदार दिसतो.
सध्या कुचाचे वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून सगळीकडे या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरू आहे.