लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांचा शुक्रवारी मालगाडीने कटून मृत्यू झाला होता. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, शनिवारी लोहमार्ग पोलिसांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचे बयाण नोंदविले आहे. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शनिवारी महावितरणच्या लिपिकांना लोहमार्ग पोलीस ठाण्यात बयाण नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले. दिलीप घुगल यांना कार्यालयीन ताणतणाव होता का, मागील काही दिवसात त्यांची कार्यालयात कशी वागणूक होती, याबाबत या लिपिकांना विचारणा करण्यात आली. परंतु घुगल यांना कोणताच तणाव नसून ते कार्यालयात चांगल्या मन:स्थितीत वावरत होते, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी लोहमार्ग पोलिसांना दिली आहे. घुगल यांच्या मृत्यूप्रकरणी आणखी महावितरणचे अधिकारी, इतर कर्मचारी आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात येणार आहे. साधारणपणे या तपासात १ ते ३ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
मुख्य अभियंता मृत्यू प्रकरण : महावितरणमधील कर्मचाऱ्यांचे घेतले बयाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 12:55 AM