लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी २७ एप्रिल रोजी नागपूर खंडपीठ येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अत्यावश्यक प्रकरणावर सुनावणी घेणार आहेत. न्या. धर्माधिकारी नागपूरचे सुपुत्र असून ते २७ एप्रिलला सेवानिवृत्त होणार आहेत.न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्या. धर्माधिकारी यांनी नागपूर खंडपीठात अनेक वर्षे वकिली केली. १५ मार्च २००४ रोजी त्यांची न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. वरिष्ठतेनुसार ते अनेक महिने नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती होते. दरम्यान, त्यांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. तेथून त्यांची २० मार्च २०२० रोजी मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. त्याच महिन्यात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांना विविध खंडपीठांना भेट देण्यास वेळ मिळाला नाही. या काळात त्यांनी प्रशासकीय सूत्रे सक्षमपणे सांभाळली. न्यायालयातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता त्यांनी गेल्या महिन्याभरात केवळ अत्यावश्यक प्रकरणांवर सुनावणी घेणे, सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करणे, कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे इत्यादी अनेक कठोर निर्णय घेतले. हायकोर्ट बार असोसिएशन व अन्य वकील संघटना मिळून न्या. धर्माधिकारी यांच्या सत्कारासाठी भव्य कार्यक्रम आयोजित करणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही. न्या. धर्माधिकारी सेवानिवृत्तीपूर्वी नागपुरात असल्यामुळे वकील संघटना साधेपणाने त्यांचा गौरव करणार आहे.
मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:40 AM