लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यायव्यवस्थेला गतिमान करण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘न्याय कौशल ई-रिसोर्स’ केंद्राचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून सर्वोच्च, उच्च व जिल्हा न्यायालयांत ऑनलाईन माध्यमातून याचिका दाखल करता येणार आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे हे गुरुवारी चार दिवसीय नागपूर दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी ‘ज्योती’ येथे (ज्युडिशिअल ऑफिसर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्य परिवहन विभागाच्या ‘व्हर्च्युअल कोर्ट’चेदेखील त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्या.ए.ए.सईद, न्या.रवी देशपांडे, न्या.नितीन जमादार, न्या.सुनील शुक्रे प्रामुख्याने उपस्थित राहतील. सरन्यायाधीशांचे गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता नागपुरात आगमन होईल. त्यानंतर त्यांचा निवासस्थानी मुक्काम राहील. रविवार १ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता ते नागपुरातून दिल्लीकडे प्रयाण करतील.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचेदेखील गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी अकरा वाजता आगमन होणार आहे. शनिवार ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या उच्च न्यायालयाच्या कार्यकारी परिषद इमारत समितीच्या बैठकीला ते उपस्थित राहतील.