लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले देशाचे नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा शनिवारी माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.हायकोर्ट परिसरात आयोजित या कार्यक्रमाला सायंकाळी ६ वाजता सुरुवात होईल. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमस्थळी भव्य आणि आकर्षक व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या सत्कार सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यातून मान्यवर व्यक्ती येणार आहेत. करिता, सुमारे हजार व्यक्तींसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. या सत्कारानिमित्त परिसरातील वडाच्या झाडासभोवती छोटेसे उद्यान तयार करण्यात आले आहे. त्या ठिकाणी हायकोर्टाची माहिती देणारी शिला बसविण्यात आली आहे. त्याचे सरन्यायाधीश बोबडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यानंतर बोबडे हे प्रथमच नागपूरला येत आहेत. त्यांचा दोन दिवस नागपुरात मुक्काम आहे. ते रविवारी रात्री ९.४५ वाजता विमानाने दिल्लीला परत जाणार आहेत.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा आज सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:48 AM