लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या सुरू असल्यामुळे सरन्यायाधीश शरद बोबडे नागपूर येथील त्यांच्या घरी आले आहेत. त्यामुळे त्यांनी सोमवारी दुपारी ओडिशातील जगन्नाथ रथ यात्रा प्रकरण नागपुरातूनच ऐकले. या प्रकरणावर सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. दिनेश माहेश्वरी व न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या न्यायपीठापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.नागरिकांच्या सुविधेकरिता नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. ती मागणी अद्याप पूर्ण झाली नाही, पण सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर भूमीला सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणावरील सुनावणीचा स्पर्श झाला. नागपूरातील हा पहिलाच प्रसंग आहे. नागपूरच्या सुवर्ण इतिहासात त्याची नोंद करावी लागणार आहे.वरिष्ठ वकील जुगलकिशोर गिल्डा यांनी याविषयी ‘लोकमत’शी बोलताना नागपूरकरिता ही महत्वपूर्ण घटना असल्याचे मत व्यक्त केले. देशाच्या हृदयस्थळी असलेल्या नागपुरात सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी नागरिकांची भावना आहे. या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण नागपुरातून ऐकले गेल्यामुळे नागरिकांना आत्मिक समाधान मिळाले आहे असे त्यांनी सांगितले.