नागपूर : नागपूरचे सुपुत्र असलेले देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामधील उत्कृष्ट क्रिकेट खेळाडूचे दर्शन पुन्हा एकदा घडले. रविवारी सकाळी सिव्हिल लाईन्सस्थित व्हीसीए स्टेडियम येथे न्यायमूर्ती व वकिलांमध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात त्यांनी कडक फटकेबाजी करून १३ चेंडूंमध्ये १३ धावा तडकवल्या. दरम्यान, त्यांनी चेंडूला दोनदा सीमापार धाडले. ते तब्बल २० मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकून होते. या वेळेत त्यांनी गोलंदाजांना स्वत:वर वरचढ होऊ दिले नाही.
सरन्यायाधीश शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायदानाचे कर्तव्य बजावताना अवैध गोष्टीवर नेहमीच कडक प्रहार करतात. त्यांचा हा बाणा क्रिकेटच्या मैदानावरही दिसून आला. गोलंदाजांनी चूक केली की ते चेंडूवर कडक प्रहार करीत होते. त्यांनी २० मिनिटे केलेल्या अत्यंत आकर्षक फलंदाजीमुळे प्रेक्षक प्रभावित झाले. दरम्यान, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्या गोलंदाजीवर टोलवलेला चेंडू हवेत उडाला व ॲड. श्रीधर पुरोहित यांनी तो अलगद झेलला. त्यामुळे त्यांची खेळी संपुष्टात आली. त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना त्यांना सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. त्यांनी गेल्यावर्षी झालेल्या सामन्यातदेखील तंत्रशुद्ध फटकेबाजी करून सर्वांना प्रभावित केले होते. गोलंदाजीमध्ये मात्र त्यांना विशेष चमक दाखविता आली नाही. त्यांनी दोन षटक फेकले. त्यात त्यांनी वकील संघाला १७ धावा दिल्या.
न्यायदान यंत्रणेत कार्य करणारे सर्व जण रोज तणावपूर्ण जीवन जगत असतात. त्यातून बाहेर पडून आनंदाचे क्षण अनुभवण्याच्या उद्देशाने हायकोर्ट प्रशासन व हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने दरवर्षी न्यायमूर्ती व वकिलांमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना आयोजित केला जातो. यानिमित्ताने न्यायमूर्ती, वकील व अधिकारीवर्ग आपापल्या कुटुंबीयांसह एका ठिकाणी एकत्र येतात आणि विरंगुळ्याचे क्षण मनात साठवून घेतात.
------------
वकील संघ विजयी
२० षटकाच्या या सामन्यात वकील संघाने १९.३ षटकामध्ये ३ गडी राखून विजय मिळविला. न्यायमूर्ती संघाने न्या. प्रसन्न वराळे यांच्या ४९ धावाच्या बळावर ५ गडी गमावून एकूण १३८ धावा केल्या. न्या. वराळे यांनी ३२ चेंडू खेळताना ८ चौकार टोलवले. त्यानंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या धावा वगळता, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी १८ चेंडूमध्ये २ चौकारासह १५, न्या. नितीन जामदार यांनी ३२ चेंडूमध्ये ५ चौकारासह ३१, न्या. अतुल चांदूरकर यांनी १० चेंडूमध्ये ६, न्या. अमित बोरकर यांनी ८ चेंडूमध्ये ४ तर, न्या. नितीन सांबरे यांनी ७ चेंडूमध्ये नाबाद ५ धावा फटकावल्या. वकील संघाकडून ॲड. श्रीधर पुरोहित यांनी ५० चेंडूमध्ये ३ चौकारासह सर्वाधिक ४८ धावा फटकावल्या. माजी न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी ७, ॲड. आनंद देशपांडे यांनी २१, ॲड. प्रतीक पुरी यांनी १७, ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी नाबाद ९, ॲड. अभय सांबरे यांनी ९, ॲड. मेहरोज पठाण यांनी नाबाद २ तर, ॲड. पुरुषोत्तम पाटील व ॲड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी प्रत्येकी १ धाव काढली. न्यायमूर्ती संघातील न्या. गवई, न्या. दत्ता, न्या. चांदूरकर व न्या. हक यांनी प्रत्येकी १ तर, वकील संघातील माजी न्यायमूर्ती देशपांडे व ॲड. पुरोहित यांनी प्रत्येकी २ आणि ॲड. देशपांडे यांनी १ बळी टिपला.
---------------
न्या. भूषण गवई यांचाही सहभाग
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अनेक वर्षे कार्य केलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनीही या सामन्यात नेहमीप्रमाणे सहभाग घेतला. त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. परंतु, गोलंदाजीमध्ये त्यांनी माजी न्यायमूर्ती रवी देशपांडे यांना झेलबाद केले. त्यांनी दोन षटके गोलंदाजी केली व केवळ ११ धावा दिल्या.