लोकमत न्यूज नेटवर्क
रायपूर : छत्तीसगडमधील काँग्रेसचे आमदार बृहस्पती सिंह यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद दुसऱ्या दिवशीदेखील विधानसभेत उमटले. या मुद्द्यावर अगोदर सभागृहात गोंधळ झाला आणि त्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल व आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांच्यात वाद निर्माण झाला. स्वत:च्याच सरकारविरोधात सिंहदेव यांनी सभात्याग केला.
रामानुजगंज येथील काँग्रेस आमदारावर झालेल्या हल्ल्याबाबत जोपर्यंत सरकार स्पष्ट उत्तर देत नाही तोपर्यंत सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार नाही, अशी भूमिका सिंहदेव यांनी घेतली. २३ जुलै रोजी काँग्रेस आमदार बृहस्पती सिंह यांच्या ताफ्यावर काही तरुणांकडून हल्ला झाला होता. या हल्ल्यात आरोग्यमंत्री टी.एस. सिंहदेव यांच्या नातेवाइकाचे नाव समोर आले होते. मंत्र्यांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप बृहस्पती सिंह यांनी केला होता. यानंतर विधानसभेत गोंधळ सुरू झाला. विधानसभेत गोंधळ सुरू असताना सिंहदेव अचानक उभे झाले व आता खूप झाले, मीदेखील एक मनुष्य आहे. माझ्या प्रतिमेबाबत सर्वच लोक जाणतात. विधानसभा अध्यक्ष डॉ. चरणदास महंत यांच्या निर्देशांनंतर मुख्यमंत्र्यांनी मला बोलविले होते व या मुद्द्यावर चर्चा झाली होती. त्यानंतरदेखील इतके तोकडे वक्तव्य सभागृहासमोर आले आहे, असे ते म्हणाले.
दोषींवर कारवाईची मागणी
टी.एस. सिंहदेव यांनी या प्रकरणात पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी केली होती. ज्या लोकांनी हा हल्ला केला आहे, त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. जोपर्यंत सरकार या मुद्द्यावर स्पष्ट उत्तर देत नाही, तोपर्यंत मी सभागृहात येणार नाही, अशा स्थितीत मी आहे. राज्य सरकार माझ्यासंदर्भात उत्तर येत नाही, तोपर्यंत मी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी स्वत:ला योग्य मानत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.