नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सेनेविरोधात उमेदवार उभे केल्याने संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल यांनी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरच जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अक्षरश: मरणपंथाला लागले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना सरकारमध्ये घेतल्यामुळे ते जिवंत झाले, या शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले. अगोदर कॉंग्रेस नेते आशिष देशमुखांनी केलेला भाजपचा प्रचार व आता आशिष जयस्वाल यांनी केलेला घणाघात यामुळे जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांत नागपूर जिल्ह्याचे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. (Ashish Jaiswal)
मनसर येथे त्यांनी शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी जयस्वाल यांच्या या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अशी गळती लागली होती की, त्यांना कुत्रेही विचारत नव्हते. सत्तेत आल्यामुळे मेलेले लोक जिवंत झाले. हेच कॉंग्रेसचे लोक शिवसेनेच्या मतदारसंघात आमच्याच लोकांना डिवचत आहेत. एकेकाशी मी पुरून उरेन. रामटेकमध्ये होत असलेला हा प्रकार मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरदेखील टाकला आहे. कॉंग्रेसचे लोक जितके त्रास देतील त्याची परतफेड शिवसेना व्याजासह करण्यात सक्षम आहे, असे प्रतिपादन जयस्वाल यांनी केले.
जयस्वालांचा नेमका रोख कुणावर ?
भाषणादरम्यान जयस्वाल यांनी कुठल्याही नेत्याचे नाव न घेता पैसे देऊन मते विकत घेतल्याचा आरोप लावला. पदावर असो किंवा नसो सेनेचे कार्यकर्ते जनतेसाठी काम करतात. पदासाठी आम्ही भुकेले नाही. लोकांच्या कानशिलावर बंदूक लावून मते घेतलेली नाहीत. इतर पक्षांतील लोक पदाचा उपभोग करणारे असून निवडणूक आली की घराबाहेर निघतात, या शब्दांत टीका केली. त्यांचा रोख नेमका कोणत्या नेत्याकडे होता याबाबत चर्चा रंगली आहे.