लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजारो एकर जमीन एक रुपयाच्या लिजवर घेतली. गरिबी हटाओचा नारा दिला पण गरिबांना मालकीची जागा दिली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकारने शासकीय मालकीच्या जागेवर वर्षानुवर्षे वसलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पट्टे वाटपासोबतच घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पैसाही देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.नागपूर सुधार प्रन्यासतर्फे आयोजित पूर्व नागपुरातील झोपडपट्टीवासीयांना पट्टे वाटप कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोेपडे, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, परिवहन सभापती बंटी कुक डे, विधी समिती सभापती अॅड. धर्मपाल मेश्राम,मागासवर्गीय विशेष समितीचे सभापती हरीश दिकोंडवार, बाल्या बोरकर, दिव्या घुरडे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, महानगर आयुक्त व नासुप्र सभापती शीतल उगले,अपरआयुक्त अजीज शेख आदी उपस्थित होते.गेल्या २० वर्षापासून झोपडपट्टीधारकांना पट्टे मिळावे यासाठी मागणी करीत होतो. मात्र मागच्या सरकारच्या काळात निर्णय झाला नाही. ज्याल जमिनीचा अधिकार मिळाला तोच गरिबीतून बाहेर येतो. याचा विचार करुन राज्य सरकारने झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे वाटपाबाबत काढलेल्या नवीन अध्यादेशामुळे ग्रामीण भागातील दहा लाख तर शहर भागातील दहा लाख लोकांना लाभ मिळणार आहे. पट्टे वाटपासोबत जागेची रजिस्ट्री मिळणार आहे. यामुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली. अशा लोकांकडून अपप्रचार केला जाईल. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. पट्टे वाटपाच्या निर्णयातून झोपडपट्टीधारकांच्या जीवनात नवी पहाट उगवली आहे. शेवटच्या माणसाला याचा लाभ मिळेपर्यत पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार कृष्णा खोपडे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पट्टेवाटपाचा निर्णय घेतल्याबद्दल जनतेच्यावतीने त्यांचे आभार मानले. यावेळी धर्मपाल मेश्राम व बंटी कुकडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून नासुप्रच्या सभापती शीतल उगले यांनी पट्टेवाटपाची माहिती दिली. संचालन महेंद्र राऊत यांनी केले.आमचे राजकारण विकासाचेआम्ही जात, पात, पंथ, धर्म बघून कधीच राजकारण केले नाही. ज्यांनी मत दिले त्यांनाही आणि ज्यांनी मत दिले नाही त्यांच्यासाठीही कार्य केले. गरिबाला धर्म, पंथ नसतो. विकासाच्या कामात कधीच भेदभाव केला नाही. आमचे विकासाचे राजकारण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महापालिका व नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे देण्याची मागणी आम्ही गेल्या २० वर्षापासून करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी पट्टे वाटपाचा ऐतिहासिक निर्णय घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून १० हजार घरे दिली जाणार असून २०२२ पर्यंत सर्वांना घरे दिली जाणार आहे. नागपूर शहरासह राज्याचा व देशाचा चौफेर विकास होत आहे. देश बदलत असल्याने मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी २० हजार कोटी, नागनदी प्रकल्पासाठी १४०० कोटी, पूर्व नागपुरातील रिंगरोडसाठी २ हजार कोटी, सिम्बॉयसिससाठी ४५० कोटी तर ‘साई’ केंद्रासाठी १२० कोटी मंजूर करण्यात आले आहे. ताजबाग, दीक्षाभूमी, शांतिवनच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला आहे. मिहान प्रकल्पात २२ हजार युवक ांना रोजगार मिळाल्याची माहिती गडकरी यांनी दिली.३५ हजार नागपूरकरांना लाभ : ना. बावनकुळे१७ नोव्हेंबर २०१८ चा शासन आदेश हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट आहे. यामुळे एकट्या नागपुरातील सुमारे ३५ हजार झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानीचा दर्जा असलेल्या नागपूर शहराला रखडलेले ३५० कोटींचे विशेष अनुदान मिळवून दिले. जीएसटीची तूट भरून काढीत ४० कोटी प्रति महिना अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासन प्रत्येकाच्या हिताचे निर्णय घेत आहे. स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. यात आता नागपूरला पहिल्या १० स्वच्छ शहरांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी आता नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.४५ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात पट्टेवाटपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नऊ झोपडपट्टीतील प्रत्येकी पाच अशा एकूण ४५ झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले. यात पडोळेनगर, संघर्षनगर, डिप्टी सिग्नल, हिवरीनगर, सोनबा नगर, साखरकरवाडी, कुंभारटोली, हसनबाग व नंदनवन येथील झोपडट्टीधारकांचा समावेश आहे.