नागपूर - मुख्यमंत्री महोदय आता सांगा क्या हुआ तेरा वादा, असे म्हणत धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही?, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री धनगर समाजाला आरक्षण देणार आहेत की नाही ही स्पष्टता आम्हाला ९७ च्या चर्चेत अपेक्षित आहे, अशी स्पष्ट भूमिका धनंजय मुंडे यांनी नियम ९७ च्या चर्चेदरम्यान मांडली. बुधवारी (18 जुलै) सकाळी धनगर समाजाच्या आरक्षणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेत ते बोलत होते. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर शरसंधान साधले.
टीस ही स्वायत्त संस्था आहे. या संस्थेला कोणताही संवैधानिक अधिकार किंवा दर्जा नसताना त्यांनी दिलेला अहवाल कायदेशीर पातळीवर कसा ग्राह्य मानला जाईल, अशी शंका धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली व सरकार या संस्थेच्या नावाखाली धनगर समाजाची फसवणूक करीत आहेत असा आरोप केला.
आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही, असे सांगितले होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही धनगर समाजाच्या आरक्षणाविरोधात विधान केले . यांचे सर्वोच्च नेते विरोधात बोलत असतील तर राज्याचे मंत्री कसे आरक्षण देणार असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला.