लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची शनिवारी नागपुरात मॅरेथॉन बैठक झाली. महायुतीत सुरू असलेल्या कुरबुरी आणि विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या गणितावर या बैठकीत मंथन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरी येथे झालेल्या या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मुंबईला परतीचा नियोजित प्रवास रद्द केला.
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी शनिवारी मुख्यमंत्री, अजित पवार व देवेंद्र फडणवीस नागपुरात आले होते. सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री मुंबईला रवाना होणार होते. तसा त्यांचा शासकीय दौरादेखील निश्चित झाला होता. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात गेले. तेथून विमानतळाकडे न जाता ते थेट मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीवरच पोहोचले. अनेकांना ते रात्री आठ वाजताच्या सुमारास जातील असे वाटले होते. मात्र प्रत्यक्षात महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीचे नियोजन झाले होते. रात्री ८.१० सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामगिरीवर पोहोचले. त्यापाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळेही पोहोचले. तर पुढील १० मिनिटांत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल ही रामगिरीवर पोहोचले. रात्री सव्वा नऊ वाजता सुनिल तटकरे बैठकीत सहभागी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाबाबत मंथन झाले. काही जागांवरून महायुतीत दावे-प्रतिदावे आहेत. भाजपला जास्त जागा लढवायच्या आहेत. तर शिवसेना व राष्ट्रवादीलादेखील यावेळी बराच पेच निर्माण झाला आहे. भाजपाला जास्तीत जास्त जागा लढवायच्या आहेत तर एकनाथ शिंदे-अजित पवार हेदेखील जागांवरील दावा सोडायला तयार नसल्याचे चित्र आहे. या मुद्द्यावरून रात्री पावणे बारा वाजेपर्यंत बैठक सुरू होती.
- ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी बदलले दौऱ्याचे नियोजननियोजनानुसार मुख्यमंत्री सायंकाळी साडेपाच वाजता मुंबईला परत जाणार होते. मात्र महायुतीचे सर्वच महत्त्वाचे नेते नागपुरात असल्यामुळे तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीतील चर्चा पूर्णतः राजकीय स्वरुपाची होती. यात विदर्भ, मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या जागांवरदेखील सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- सक्षम उमेदवारालाच प्राधान्य देणार
या बैठकीत वाद असलेल्या जागांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः काही जागांवर दोन किंवा तीनही पक्षांचे उमेदवार लढण्यासाठी दावेदारी करत आहेत. अशा जागांवर जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्यालाच प्राधान्य देण्यात यावे अशी भूमिका मांडण्यात आली. मात्र असे झाले तर जागावाटपाचे गणित बिघडेल आणि मग त्या जागांची भरपाई इतर कुठल्या जागांवरून होईल यावरून फॉर्म्युल्याचे घोडे अडलेले आहे.
- आपसातील वाद चव्हाट्यावर नकोमागील काही दिवसांपासून महायुतीतील घटक पक्षांतील काही प्रवक्ते किंवा नेत्यांकडून एकमेकांविरोधात वक्तव्ये देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल नसल्याचेच चित्र आहे. याचा फटका निवडणूकीत बसू शकतो याची जाण वरिष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे आपसातील वाद चव्हाट्यावर आणण्यापासून पक्षातील पदाधिकाऱ्यांना थांबविले पाहिजे याबाबत सर्वांचेच एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.