विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संपूर्ण राज्य सरकार नागपूर मुक्कामी आहे. हा मुहूर्त साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपाच्या सर्व मंत्री व आमदारांना ‘बौद्धिक’ मेजवानी देण्यात येत आहे. आज मंगळवारी रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात हा उद्बोधन वर्ग होईल. या वर्गाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील उपस्थित आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही येतील, असे भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे जुने स्वयंसेवक आहेत, असेही त्यांनी सांगितले.
२०१४ सालापासून संघाकडून आमदारांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात अधिवेशनच न झाल्याने हा वर्ग झाला नव्हता. या माध्यमातून संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून संघ विचारधारा आणि सामाजिक क्षेत्रात कार्याबाबत बौद्धिक देण्यात येते. यंदादेखील हिवाळी अधिवेशनानिमित्त राज्यभरातील आमदार नागपुरात आले आहेत. त्यामुळे संघभूमीत परत येत असताना सर पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे अशी अनेकांची इच्छा होती. यंदा संघाकडून उद्बोधन वर्गाचे आयोजन होणार की नाही, याबाबत आमदारांमध्ये संभ्रम होता. परंतु २७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास या वर्गाचे आयोजन संघाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी, सकाळीत अनेक आमदार आणि काही मंत्री रेशीमबागेत दिसून आले.
यावेळी आमदार व मंत्री रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात जाऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर महर्षी व्यास सभागृहात सर्वांना संघ पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. शिंदे गटातील आमदार यावेळी राहणार का याबाबत निश्चितता नाही. मात्र, मुख्यमंत्री येतील असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
स्मृती मंदिरमध्ये आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला पुष्पांजली करण्यासाठी मंत्री दाखल झाले आहेत. आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात येणार. शिवसेना गेली २५ वर्ष आमच्यासोबत होती. परंतु, या ठिकाणी त्यांच्यामधील लोक येत नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील इथे येतील कारण ते ही जुने स्वंयसेवक आहेत, असे महाजन यांनी यावेळी सांगितले.
वर्गात भाजप आमदारांना अनिवार्य
यासंदर्भात पक्ष प्रतोदांनी नोटीस जारी केली आहे. भाजपच्या सर्व आमदारांना वर्गात येणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही वर्षांअगोदर स्मृती मंदिर परिसरात न गेलेल्या सदस्यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली होती. भाजपने या संदर्भात आदेश काढले असले तरी शिंदे गटाकडून मात्र तरी कुठलेही आदेश काढण्यात आले नसल्याची माहिती शिंदे गटाच्या एका आमदाराने दिली.
हे स्थान ऊर्जा अन् प्रेरणेचं - फडणवीस
गेले पंचवीस वर्षे नागपूर अधिवेशन असताना भाजपचे सर्व आमदार या ठिकाणी येतात. डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन आम्ही घेतो. हे स्थान आमच्यासाठी ऊर्जेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे.जिथून राष्ट्रीयतेचे विचार घेऊन आम्ही देशात सर्वत्र काम करतो. त्या ठिकाणी ऊर्जा घेण्यासाठी आम्ही येतो. आज सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे एक पुस्तक सर्वांना भेट देण्यात आले असून भविष्यातला भारत कसा असेल याचा वेध घेणारा पुस्तक असून सर्वांनी तो वाचावा आणि पुढे त्या दिशेने काम करावं अशी अपेक्षा आहे.