नागपूर : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सिडकोच्या कथित भूखंड घोटाळ्यावरून थेट आरोप होताच, या भूखंड विक्री व्यवहारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्थगिती दिली. तशी माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली.सिडकोतील १७६७ कोटी रुपयांची २४ एकर जमीन कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आली होती. मात्र, ती जमीन बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांना विकण्यात आली. या जमीन विक्रीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यहार झाल्याचा आरोप करत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या भूखंड व्यवहाराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केले होते.विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी सिडको भूखंडासह आघाडी सरकारच्या काळातील २०० भूखंडाची न्यायालयीन चौकशीची घोषणा विधानसभेत केली. मात्र, ज्या भूखंड व्यवहारावरून फडणवीस यांच्यावर आरोप झाले, त्याला स्थगिती देण्याची औपचारिक घोषणा केली नव्हती. ती शुक्रवारी त्यांनी केली.शुक्रवारी विधानसभेचे कामकाज विजेअभावी बंद पडल्याने फडणवीस यांनी विधान परिषदेत स्थगितीबाबतचे निवेदन केले. फडणवीस म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील जी जमीन आठ प्रकल्पग्रस्तांना दिली होती, ती त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा आपण गुरुवारी केली. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला गेला होता. त्या अनुषंगाने या व्यवहाराला स्थगिती देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.मुख्यमंत्र्यांनीच आता या व्यवहारास स्थगिती दिल्याने, आम्ही उपस्थित केलेला मुद्दा वैध होता, यास पुष्टी मिळाली, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.न्यायालयीन चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत या भूखंडांची विक्री होणार नाही, याची खबरदारी घेऊन, तेथे थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण होणार नाहीत, याची काळजी त्यांनी घेणे बंधनकारक आहे.- देवेंद्र फडणवीस
सिडको भूखंडाच्या विक्रीस स्थगिती, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 6:05 AM