गडकरींचे गौरवोद्गार : देवेंद्र फडणवीस यांना ‘नागभूषण पुरस्कार’ पुरस्कार प्रदान नागपूर : मी महाराष्ट्राच्या विधिमंडळात काम करीत असताना मला पक्षाच्या आदेशाने दिल्लीला जावे लागले आणि माझ्यानंतर ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर पडली. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि आपल्या अभ्यासू वृत्तीच्या बळावर तत्कालीन सरकारचे अनेक घोटाळे बाहेर काढले. त्यांच्या भाषणांची चर्चा व्हायला लागली, त्यांच्या नेतृत्वाची झलक अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. आज तेच अभ्यासू फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला व्हिजन देणारा हा नेता आहे. त्यांच्या नेतृत्वात राज्य विकासाचा एक नवीन इतिहास निर्माण करेल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. नागभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा ‘नागभूषण पुरस्कार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी गडकरींच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर तर विशेष अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, खा. अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह मंचावर नागभूषण फाऊंडेशनचे सचिव डॉ. गिरीश गांधी, अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कोषाध्यक्ष ब्रजकिशोर अग्रवाल उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, आम्हाला राज्याचा व देशाही विकास अपेक्षित आहे. परंतु मी आणि देवेंद्र दोघेही नागपूरचे असल्याने आम्ही नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही जण त्यावरही टीका करीत आहेत. परंतु त्या टीकेची पर्वा नाही. प्रत्येकाचे आपल्या शहरावर विशेष प्रेम असते तसे ते आमचेही आहे आणि या प्रेमापोटी आम्ही ही विकासगंगा शहरात आणली आहे. सत्तेत नसताना अनेक अपमान पचवले. ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हेटाळणीही सहन केली. परंतु आज सर्वाधिक ओबीसी आमच्या पक्षात आहेत. सत्ता येईल -जाईल, शेवटी तुम्ही सत्तेतून काय विचार देता हे महत्त्वाचे आहे. देवेंद्रवरही त्याच विधायक विचारांचे संस्कार झाले आहेत. म्हणूनच त्याला आज ‘नागभूषण पुरस्कार’ प्रदान करताना मला विशेष आनंद होत असल्याचे गडकरींनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी म्हणाले, हा सत्कार म्हणजे नागपूरच्या एका कर्तृत्ववान सुपुत्राने दुसऱ्या कर्तृत्ववान सुपुत्राचा केलेला सन्मान आहे. जे या आधी कुणाला जमले नाही त्या महाराष्ट्राचे राजकारण फडणवीसांनी कवेत आणल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांनीही आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांशी असलेल्या कौटुंबिक संबंधांना उजाळा देत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. प्रास्ताविक खा. अजय संचेती यांनी केले. संचालन रेखा दंडिगे तर आभार अशोक गांधी यांनी मानले. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी) पद्मभूषणपेक्षाही मोठा पुरस्कार - मुख्यमंत्री आज हा जो पुरस्कार मला मिळालाय तो माझ्यादृष्टीने पद्मभूषणपेक्षाही मोठा पुरस्कार आहे. याचे कारण, एक तर ही कौतुकाची थाप देणारी मंडळी माझ्या घरची आहेत आणि दुसरे म्हणजे ही पुरस्कार मला नितीन गडकरींच्या हस्ते मिळतोय. माझ्या या यशात नितीनजींचा फार मोठा वाटा आहे. त्यांनीच मला राजकारणात आणले म्हणून मी मुख्यमंत्री होऊ शकलो. मला राजकारण फार करता येत नाही. जे जनहिताचे आहे ते मी करीत असतो. ते करताना परिणामांची पर्वा करीत नाही. मी तुम्हाला शब्द देतो येत्या पाच वर्षात विदर्भाचा चेहरा पूर्णपणे बदललेला असेल. त्यातल्यात्यात नागपूरवर माझे विशेष लक्ष आहे. कारण, हे माझे शहर आहे. माझ्या जीवनाचा शेवट याच शहरात होणार आहे. मुंबई-पुण्यासह आम्हाला अवघ्या महाराष्ट्रालाच विकासाची नवी दिशा द्यायची आहे या शब्दात मुख्यमंत्र्यांनी सत्काराला उत्तर दिले व हे विकासपर्व कसे सुरू आहे हे सांगताना विविध भागात सुरू असलेल्या योजनांची आकडेवारीसह माहितीही दिली. फडणवीसांची विनयशीलता अन् गडकरींचे आशीर्वाद शाल, श्रीफळ व एक लक्ष रुपयाचा धनादेश असे स्वरुप असलेला ‘नागभूषण पुरस्कार’ गडकरींनी मुख्यमंत्र्यांना प्रदान केल्यावर मुख्यमंत्र्यांनी गडकरींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला. गडकरींनीही मुख्यमंत्र्यांना कडकडून मिठी मारली. यावेळी अवघे सभागृह टाळ्यांनी दणाणून गेले. मला कधीच मुख्यमंत्री व्हायचे नव्हते देवेंद्र मुख्यमंत्री झाला तेव्हा अनेक जण बोलत सुटले की गडकरींची संधी गेली. परंतु मुख्यमंत्री झालोच पाहिजे अशी अपेक्षा मी कधीच बाळगली नाही. या विषयावरून आमच्यात कधी मतभेदही झाले नाहीत. हा मीडियाने फुगवलेला फुगा आहे. आम्हा दोघांमध्येही योग्य संवाद नि समन्वय आहे, अशा शब्दात गडकरी व फडणवीस यांच्यात लावालावी करणाऱ्यांना गडकरींनी इशारा दिला.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला व्हिजन दिले
By admin | Published: January 02, 2017 2:07 AM