आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल अॅपमुळे सामान्य नागरिक अधिक सक्षम झाले असून, पोलीस प्रशासन नागरिकांप्रती उत्तरदायी झाले आहे. अॅपच्या माध्यमातून नागरिकांना गुन्हे विषयक कोणताही रेकार्ड कुठेही बसून (आॅनलाईन) पाहता येणार आहे. आॅनलाईन तक्रार करणे, तपासाची स्थिती जाणून घेणे या बाबी सहज उपलब्ध होणार आहे. अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्राने पारदर्शितेकडे भक्कम पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.चिटणवीस सेंटर येथे आयोजित महाराष्ट्रातील गुन्हेगारी- २०१६ या पुस्तकाचे विमोचन आणि महाराष्ट्र पोलीस सिटीझन पोर्टल अॅपचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दिपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतीश माथुर, अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम प्रामुख्याने उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन वेगवेगळया उपाययोजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे मोबाईल अॅप पोलीस विभागाने विकसित केले आहे. महाराष्ट्र सारख्या मोठया राज्यासाठी हे काम अतिशय कठीण होते. मात्र पोलीस विभागाच्या विशेष प्रयत्नांनी हे अॅप विकसित करण्यात यश मिळाले आहे. आता नागरिकांना आॅनलाईन तक्रार केल्यानंतर त्याचा ईलेक्ट्रानिक पुरावा त्यांच्याकडे राहणार आहे. त्यामुळे पोलिसांनी तक्रार नोंदविली नाही अशी सबब सांगता येणार नाही. वेगवेगळया तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पोलीस विभागाला पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचा उपयोग लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी होणार आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केले.देशात सीसीटीएनएस सर्वप्रथम महाराष्ट्रातसीसीटीएनएस प्रणाली राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. यामुळे गुन्ह्याचा तपास, पुरावे शोधणे व गोळा करणे, माहिती गोळा करणे तसेच साठवणे सहज शक्य होणार आहे. गुन्हा सिध्दतेचा दर राज्यात वाढला आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपीला शिक्षा झाली नाही तर कायद्याचा धाक गुन्हेगारांवर राहत नाही. गुन्हा सिध्दतेसाठी पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्यामुळे हा दर वाढला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.महाराष्ट्रातील गुन्हेगारी २०१६ या पुस्तकाचे विमोचन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. पुस्तकात राज्यातील गुन्ह्यांची वस्तुनिष्ठ सांख्यिकी माहिती, विवेचन, गुन्हेगारीच्या प्रवाहाचे शास्त्रोक्त विश्लेषण तसेच गुन्ह्यांचे नवीन स्वरूप आणि गुन्ह्यांमधील चढ-उतार इत्यादी माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारी - २०१६ अहवालामध्ये एकूण २३ प्रकरणे असून त्यामध्ये महत्त्वाची प्रकरणे गुन्हे सर्वेक्षण, मोठ्या शहरातील गुन्हेगारी, स्त्रियांवरील अत्याचाराचे गुन्हे, बालकांवरील अत्याचार, आर्थिक गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे गुन्हे, बालगुन्हेगारी आदींचा समावेश आहे. यावेळी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांनी मोबाईल अॅपचे सादरीकरण केले.