लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत १९७१ नंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधिमंडळच्या मान्सून अधिवेशनावरील काळे ढग अजूनही कायम आहेत. शुक्रवारी विधानभवन परिसर जलमय झाल्याने वीज पुरवठा खंडीत करावा लागला होता. त्यामुळे सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते. सर्व काही सुरळीत झाल्याचा दावा करीत सोमवारी दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजास सुरुवात झाली. परंतु संकट अजूनही टळले नाही. सकाळी केबल तुटल्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकऱ्यांचे फोन व इंटरनेट सेवा ठप्प पडली होती. तर सायंकाळी काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांची खुर्ची तुटली.शुक्रवारी विधनभवन परिसरात पाणी जमा झाल्याने उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सर्व सुरळीत करून ठोस उपाययोजना करण्याचे आदेश बजावले होते. यासोबतच पीडब्ल्यूडीने विधानभवन परिसराच्या मागच्या बाजूला असलेल्या नाल्यांची सफाई आणि आवश्यक खोदकाम केले होते. परंतु रविवारी पीडब्ल्यूडीच्या ठेकेदारांनी जेसीबीने नाल्याला लागून खोदकाम करताना बीएसएनएलचे केबल तोडले. केबल तुटल्याने मुखयमंत्री कार्यालय, मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक मंत्री, समिती प्रमुख गोपाल अग्रवाल, ए.सी. कोल्हे आदींच्या कार्यालयासह ३० फोन बंद पडले होते. या टेलिफोन लाईनच्या माध्यमातून इंटरनेट सेवाही प्रभावित झाली होती. परंतु सोमवारी सकाळी ९ वाजता विधानभवन परिसरात तैनात दूरसंचार विभागाचे ज्युनियर टेलिफोन आॅफिसर प्रफुल्ल एनुरकर यांना टेलिफोन बंद पडल्याची सूचना मिळाली. तेव्हा एनुरकर हे लगेच विधानभवनात पोहोचले. त्यांनी तात्काळ केबल लाईनची तपसणी केली तेव्हा नाल्याला लागून असलेल्या ठिकाणी केबल तुटल्याचे आढळून आले. त्यांनी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना मोबाईलवर माहिती देऊन बोलावून घेतले. परंतु खोदकाम करणाऱ्या मजुरांच्या पासेस बनवताना वेळ झाला. बीएसएनएल कर्मचाऱ्यांनी तातडीने सर्वात अगोदर मुख्यमंत्री कार्यालयातील टेलिफोन १५ ते २० मिनिटांत सुरू केला. परंतु मंत्री आणि समिती प्रमुखांचे फोन सुधवण्यासाठी दुपारी ३ वाजले. दोन्ही सभागृहातील कामकाज सुरू असल्याने कुणालाही फोनची लाईन तुटल्याचे समजले नाही.सांगितल्यानंतरही जेसीबी चालकाचा निष्काळजीपणाया प्रकरणात विधान भवन परिसरात तैनात कनिष्ठ टेलिकॉम आॅफिसर प्रफुल्ल एनुरकर यंनी सांगितले की, नाल्याची सफाई करताना पीडब्ल्यूडीच्या ठेकेदाराला खाली टेलिफोन केबल असल्याची सूचना देण्यात आली होती. केबल असल्याने सावधगिरीने काम करण्याची ताकीदही दिली होती. त्यानंतरही निष्काळजीपणे काम केले. पुढच्या सत्रात नाल्याजवळून असलेली संपूर्ण केबललाईन हटवून दुसऱ्या ठिकाणी टाकली जाईल.मुख्यमंत्र्यांचा आवाजही दबलामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा शुक्रवारी झालेल्या पावसावर बोलत होते. तेव्हा त्यांचा माईकही बिघडला होता. त्यांचा आवाज दबला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यावर चिमटाही काढला होता. तरीही मुख्यमंत्र्यांनी आपले बोलणे सुरू ठेवले.वडेट्टीवारांची खुर्ची तुटलीविधानसभेत सायंकाळी विधेयकावर बोलण्यासाठी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार जसे उठायला गेले तशीच त्यांची खुर्ची तुटली. यानंतर गोंधळ उडाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नवीन बनवण्यात आलेली खुर्ची कशी काय तुटली, हे सर्व काय सुरूआहे असा प्रश्न उपस्थित केला. सदस्यांनी खुर्ची व्यवस्थित करण्याची मागणी केली. यावर तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी यावर लगेच दखल घेण्याची सूचना केली. तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी सकाळपर्यंत खुर्ची ठीक केली जाईल, असे सांगितले. यानंतरही सदस्यांचा गोंधळ सुरूअसल्याने ते स्वत: खुर्ची ठीक करून देतील, असे सांगितले.