चैतन्य आष्टनकर अपहरण : पोलिसांची महत्त्वाची कामगिरीनागपूर : अपहरण केलेल्या मनीषनगर येथील चैतन्य आष्टनकर याची नागपूर पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या अपहरण नाट्यात नागपूर पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावून मोठ्या कौशल्याने हे प्रकरण हाताळल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपोलीस आयुक्त राजवर्धन, पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, सहायक पोलीस आयुक्त तोरे आदींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.चैतन्य सुभाष आष्टनकर या १४ वर्षीय शाळकरी मुलाचे अपहरण झाले होते. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे झाले होते. मुलाला काहीही होऊ नये या दिशेने पोलिसांनी व्यूहरचना आखली. मोठ्या कौशल्याने व शिताफीने गुन्हेगारांना अटक करून चैतन्यची सुखरूप सुटका केली. या अपहरणामागे खंडणीचा हेतू होता. नागपूर शहरातील नागरिकांचे या घटनेकडे लक्ष लागले होते. चैतन्यचे बरेवाईट तर होणार नाही ना, अशी भीती वाटत होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे स्वत: याकडे लक्ष ठेवून होते. पण या नाट्यमय घटनेचा शेवट चांगला झाल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि पोलिसांचे जाहीर कौतुक केले.या सर्व मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, सचिन लुले, दिनेश दहातोंडे, प्रमोद सानप, श्रीनिवास मिश्रा, तसेच सोनेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण जगताप, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, संदीप येळे व पोलीस हवालदार धर्मेंद्र सरोदे, संदीप पाटील व इतर यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांनी केले पोलिसांचे कौतुक
By admin | Published: January 12, 2016 2:59 AM