प्रदेशाध्यक्ष दानवेही उपस्थित : नव्या चेहऱ्यांना संधीनागपूर : रविवारी दुपारी संघ मुख्यालयात संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने नागपुरात दाखल झाले. महालातील संघ मुख्यालयात जाऊन संघ पदाधिकाऱ्यांशी जवळपास तासभर चर्चा केली. या चर्चेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत मोदी यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवी झेंडी दिली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागपुरात येत संघाशी चर्चा केली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे कौटुंबिक कामासाठी सकाळीच नागपुरात दाखल झाले. यानंतर दुपारनंतर संघ मुख्यालयात संघ सरकार्यवाह भय्याजी जोशी नागपुरात दाखल झाले. क्षेत्रीय प्रचारक रवी जोशी, प्रदेश भाजपचे संघटन मंत्री रवींद्र भुसारी, महानगर संघचालक राजेश लोया या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर सायंकाळी ६ च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने विमानाने नागपुरात दाखल झाले व महालातील संघ कार्यालयात पोहोचले. तेथे या सर्व नेत्यांची तासभर बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळात असलेल्या कोणत्याही मंत्र्याला कमी करून नाराजी ओढवून घेण्यापेक्षा चांगले काम करीत असलेल्या इतर नेत्यांना विस्तारात सामावून घ्यावे, असे या बैठकीत ठरले.पुढील वर्षात होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे गणित आखून कुणाला संधी देणे फायद्याचे ठरेल, यावर विचारमंथन झाले. बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस मुंबईसाठी रवाना झाले. बैठकीनंतर संघ व भाजपमधील कुणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. (प्रतिनिधी)
मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चेसाठी मुख्यमंत्री संघ मुख्यालयात
By admin | Published: May 09, 2016 2:53 AM