जलयुक्त शिवार : सचिन कुर्वे यांच्या कामाचे केले कौतुक नागपूर : ‘जलयुक्त शिवार’ला आता लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. नागपुरातसुद्धा जलयुक्त शिवारची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. नागपुरात विशेषत: काटोल तालुक्यात सुरू असलेल्या या कामांची क्वालिटी आणि गती लक्षात घेता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. ट्युटरवर त्यांनी काटोल तालुक्यातील कामांचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. संपूर्ण राज्यभरात ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळ कायमस्वरूपी निवारण्याचा मोठा संकल्प हाती घेण्यात आला आहे. नागपूर हा खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांचा जिल्हा असल्याने नागपुरातही मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या योजनेचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षात नागपूर जिल्ह्यात एकूण ३१३ गावांमध्ये ५,२०० कामे हाती घेण्यात आली होती. त्यातील बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली. यावर्षीसुद्धा जवळपास तितकीच कामे आहे. परंतु यंदा क्वालिटी बेसीकवर भर दिला जात आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे स्वत: यावर जातीने लक्ष ठेवून आहेत. काटोल तालुक्यामध्ये पहिल्याच वर्षी लोकसहभागातून क्रांती घडविण्यात आली होती. स्वत: जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंग हे काटोलमध्ये येऊन गेलेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने गोंडीदिग्रस येथील लांडगी नदी पुनरुज्जीवित करण्यात आली. परिसरातील भूजल पातळीसुद्धा वाढली. त्याचप्रकारे कळंबा येथेसुद्धा नाली खोलीकरणाच्या कामामुळे जवळपास १० गावातील भूजल पातळीमध्ये वाढ करण्यात आली. याच कामाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)गुणवत्तापूर्ण कामावर भर जलयुक्त शिवार ही अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील कामाचे कौतुक केले, याचा आनंद आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली असेच गुणवत्तापूर्ण काम करण्यावर आपला भर राहील. - सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी नागपूर
जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप
By admin | Published: July 01, 2016 2:58 AM