युग चांडक हत्याकांड खटला : तपास अधिकारी जयस्वाल यांची उलटतपासणी साक्षनागपूर : मुख्यमंत्री नागपूरचे रहिवासी असल्याने त्यांची तपासावर देखरेख होती, हे खरे नाही, अशी साक्ष तपास अधिकारी निवृत्त पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी उलटतपासणीत युग चांडक अपहरण-हत्याकांड खटल्याच्या सुनावणीदरम्यान मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात दिली. आरोपी अरविंद सिंग याचे वकील अॅड. मनमोहन उपाध्याय हे जयस्वाल यांची उलटतपासणी साक्ष घेत होते. जयस्वाल पुढे म्हणाले की, हे खरे आहे की, या गुन्ह्याचा समाजाच्या सर्व स्तरातून निषेध करण्यात आला होता, आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा, यासाठी पोलीस आयुक्त काळजी घेत होते. तपासासाठी आपणावर कोणताही बाह्य दबाव नव्हता, हे खरे आहे. हेही खरे आहे की, आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांडदरम्यान त्यांना सदर आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले जात होते. आमच्या लकडगंज पोलीस ठाण्यातही पोलीस कोठडी उपलब्ध होती. कायदा व सुव्यवस्थेची समस्या टाळण्यासाठी आणि आरोपींच्या सुरक्षेसाठी आम्ही त्यांना वेगवेगळे सदर आणि अंबाझरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवत होतो. हे खरे आहे की, राजेशचे लाल रंगाचा टी-शर्ट घातलेले आणि अरविंदचे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेले छायाचित्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते. या गुन्ह्याच्या संबंधाने प्रसिद्ध झालेल्या वृत्तात आपण त्यावेळी पडताळा केला नव्हता. त्यावेळी आपणाला या गुन्ह्याच्या संबंधातील वृत्त असलेले ई-न्यूजपेपरही पाहण्याची संधी मिळाली नव्हती. आरोपी हे ३ सप्टेंबर रोजी सदरच्या पोलीस कोठडीत असताना ते कोणते कपडे घालून होते त्याचे वर्णन मी आज करू शकत नाही. १ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात असताना सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास युगच्या अपहरणाची तक्रार प्राप्त झाली होती. अपहरणकर्ते निश्चितच खंडणीसाठी डॉ. चांडक यांना फोन करतील, असे आपणास वाटले होते. रात्री ८.१७ वाजता डॉ. चांडक यांनी पोलीस ठाण्यात येऊन खंडणी मागणीच्या फोनबाबत सांगितले होते. आपण या माहितीची स्टेशन डायरीत नोंद घेतली नव्हती. १ सप्टेंबर २०१४ रोजी आरोपी राजेशला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्याला घरी जाण्यास सांगण्यात आले होते, हे खरे आहे. दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. अरविंदला सायंकाळी ४.३० वाजता पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याला वैशालीनगर येथील शिकवणी वर्गातून आणण्यात आले होते, हे खरे नाही, असेही जयस्वाल यांनी सांगितले. जयस्वाल यांची अर्धवट राहिलेली उलटतपासणी साक्ष उद्या होणार आहे. तत्पूर्वी आरोपी राजेश दवारे याचे वकील अॅड. प्रदीप अग्रवाल हे आज न्यायालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या सहकारी अॅड. राजेश्री वासनिक यांनी जयस्वाल यांची उलटतपासणी साक्ष घेतली. न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, अॅड. मनोज दुल्लरवार, अॅड. प्रमोद उपाध्याय उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांची तपासावर देखरेख नव्हती
By admin | Published: June 24, 2015 2:52 AM