लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री रेणुका मंदिर संस्थान ट्रस्ट, यशोदानगर, रेणुका ले-आऊट, हिंगणा रोड येथे श्री रेणुका देवी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने परिसरातील वातावरण प्रसन्न केले आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवस्थानला भेट दिली आणि रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष सुधीर देऊळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी ट्रस्टच्या संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी रेणुका देवस्थानच्या नवरात्रोत्सवाला व कामांचे कौतुक केले. रेणुका मंदिराला शासनातर्फे ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला असून, त्यानुसार मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच परिसराचा विकास करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्त रविवारी रेणुका मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.दररोज आरती, अभिषेक, सप्तशती पाठ तसेच विविध भजन मंडळाद्वारे भजनांचे आयोजन करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता विश्वनाथ चव्हाण यांच्या चमूद्वारे ‘देवीचा गोंधळ’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होईल. बुधवारी अमर कुळकर्णी यांच्या स्वरधारा या कार्यक्रमाचे आयोजन होईल. याशिवाय गरबा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होणार असून, ७ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन होईल.
नागपुरातील रेणुका देवस्थानला मुख्यमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 11:04 AM