लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालकांच्या दुर्लक्षांचा फटका चिमुकल्यांना बसत आहे. यामुळे या वर्षभरातच खेळता खेळता गिळलेले खिळा, सेल, नाणे आणि आता सेफ्टीपिन गिळल्याचे प्रकरण समोर आले. मंगळवारी दोन वर्षाच्या मुलीने गिळलेली पिन अन्ननलिकेत जाऊन फसल्याने जीव धोक्यात आला. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता व त्यांच्या चमूने तातडीने पिन काढल्याने मोठा धोका टळला.अनुष्का महेश गैगवाल (२) रा. मंडला (मध्य प्रदेश) असे पिन गिळणाऱ्या चिमुकलीचे नाव. अनुष्काचे वडील महेश मजुरी करतात तर आई लता गृहिणी आहे. अनुष्काने शनिवार १७ नोव्हेंबर २०१८ रोजी स्वेटरला लावलेली पिन काढली आणि तोंडात ठेवली. खेळण्याच्या नादात तिने पिनच गिळली. सेफ्टीपिन उघडी होती. अन्ननलिकेजवळ जाऊन फसल्याने प्रचंड त्रास होत होता. कुटुंबीयांनी ताबडतोब जबलपूर येथील मेडिकल रुग्णालयात नेले. परंतु, रुग्णालयात सोयीसुविधा नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठविले. मंगळवार २० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अनुष्काला घेऊन आई-वडील मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात आले. बालरुग्ण शल्यचिकित्सा विभागात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अनुष्काला तातडीने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागात पाठविले. डॉ. सुधीर गुप्ता यांनी अनुष्काला तपासले. एक्स-रे काढले. त्यात खुली पिन अन्ननलिकेजवळ फसल्याचे निदर्शनास आले. खुली पिन बाहेर काढणे मोठ्या जोखिमीचे काम होते. चिमुकलीच्या जीवाला धोका होण्याची शक्यता होती. भूलतज्ज्ञाची मदत घेऊन डॉ. गुप्ता यांनी डबल बलून एन्डोस्कोप व ओव्हरट्युबच्या साह्याने अन्ननलिकेजवळ फसलेली पिन दुर्बिणद्वारे अत्यंत सावधपणे बाहेर काढली. या शस्त्रक्रियेत डॉ. अमोल समर्थ, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. हरित कोठारी, डॉ. रवी दासवानी, डॉ. विनीत गुप्ता, डॉ. इमरान, डॉ. साहिल परमार, भूलतज्ज्ञ डॉ. अभय गाणार, डॉ. योगेश झवर आदींसह सोनल गट्टेवार, रेखा केणे, शशिकला डबले, सायमन माडेकर आदींनी मोलाची साथ दिली. जीव वाचविल्याबद्दल अनुष्काच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.
मुलांकडे लक्ष द्यापिन खुली असल्यामुळे ती काढणे खूपच जोखिमीचे होते. परंतु, इतर डॉक्टर सहकाऱ्यांच्या मदतीने अनुष्काच्या पोटातील पिन बाहेर काढण्यात यश आले. सध्या अनुष्काची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगून आई-वडिलांनी लहान मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. डॉ. सुधीर गुप्ताविभागप्रमुख, गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी