सुदाम राखडे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी तालुक्यातील खैरी, खसाळा, म्हसाळा, कवठा, वारेगाव, सुरादेवी, शिरपूर, पावनगावसह अन्य शिवार ‘ग्रीन बेल्ट’ असताना या शिवारात विटांच्या भट्ट्यांची संख्या बरीच माेठी आहे. या भट्ट्या नियमबाह्य आहेत. यातील बहुतांश भट्ट्यांवर माेठ्या प्रमाणात बालमजुरांकडून काम करवून घेतले जात असल्याने विटभट्ट्यांचे मालक बालकामगार कायद्याचे खुलेआम उल्लंघन करीत असताना प्रशासन कारवाई करण्याची तसदी घेत नाही.
कामठी तालुक्यातील बहुतांश विटांच्या भट्ट्या १० ते १२ वर्षांपासून आहेत. या शिवारात शेतकऱ्यांना ओलितासाठी पाणी मिळत नाही. मात्र, वीटभट्टी मालकांना विटांच्या उत्पादनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जाते. महसूल विभागाने तालुक्यात माेजक्याच व्यक्तींना विटा तयार करण्याचा अधिकृत परवाना दिला असून, अनेकांच्या भट्ट्या अवैध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारला दरवर्षी या अवैध भट्ट्यांमुळे लाखाे रुपयांच्या महसुलावर पाणी साेडावे लागत आहे. या अवैध भट्ट्यावाल्यांना महसूल, पाेलीस व प्रशासनातील इतर अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
धानाच्या पिकाची कापणी केल्यानंतर विटांच्या निर्मितीला सुरुवात केली जाते. कमी मजुरी द्यावी लागत असल्याने बालमजुरांना माेठ्या प्रमाणात कामावर ठेवले जाते. या भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून लाकडांचा वापर केला जात असून, त्यासाठी अवैधरीत्या वृक्षताेडही केली जाते. दगडी काेळसा वापरला जात असून, काही काेळसा चाेरीचा वापरला जाताे. मातीच्या खाेदकामादरम्यान माेठे खड्डे तयार झाले आहेत. ते धाेकादायक खड्डे बुजविण्याची तसदीही कुणीही घेत नाही. हा संपूर्ण प्रकार प्रशासनाला माहिती असून, आर्थिक लागेबांधे असल्याने कुणीही कारवाई करीत नाही.
धुरामुळे प्रदूषणात वाढ
या वीटभट्ट्यांमधून निघणाऱ्या सततच्या धुरामुळे या भागात वायुप्रदूषण वाढत आहे. धुरामुळे या भागातील तापमान वाढत असल्याने शेतकरी व शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या आराेग्यासह पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम हाेत आहे. या भट्ट्यांमुळे पिकांचे नुकसान हाेत असले तरी शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे व त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याकडे महसूल विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ लक्ष द्यायला तयार नाही.
अल्पवयीन मुलीचा मृत्यू
या विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या काेणत्याही कामगाराला अथवा बालकामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने काेणतीही साधने किंवा सुविधा पुरविली जात नाही. दाेन वर्षांपूर्वी शिरपूर शिवारातील विटांच्या भट्टीवर बालकामगार असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला हाेता. असे प्रकार अधूनमधून घडत असतात. मात्र, कामगारांच्या मृत्यूची दखलही प्रशासन घ्यायला तयार नाही.
राॅयल्टीचा गैरवापर
परवानाधारक भट्टीमालकांना महसूल विभागाने एक ब्रास मातीपासून १,५०० विटा तयार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, भट्टीमालक एक ब्रास मातीपासून किमान तीन हजार विटा तयार करतात. शिवाय, माती खाेदकाम व वाहतुकीच्या राॅयल्टीचा वारंवार वापर करून एका राॅयल्टीवर दिवसभर मातीची वाहतूक केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.