नागपूर : लहानपणापासून तिच्या वाट्याला आनंदाचे क्षण आलेच नाहीत. थोडं समजायला लागलं तर आई-वडील कौटुंबिक वादातून विभक्त झाले. आजी-आजोबाने पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, या जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी दहावीची परीक्षा आटोपताच तिचे लग्न लावून देण्याचा बेत आखला. बोहल्यावर चढण्याच्या एक दिवसापूर्वी सुदैवाने शासकीय पथक तिच्या घरी धडकले व बालविवाह रोखला.
तिचा विवाह शुक्रवारी मध्यप्रदेशातील लांजी येथील मुलासोबत जरीपटका परिसलात होणार होता. चाईल्ड लाईनद्वारे ही माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाल्यानंतर जरीपटका भागात राहत असलेल्या मुलीच्या घरी पथकाने धडक दिली. मुलीच्या वयाचे कागदपत्र तपासले असता ती १६ वर्षांची असल्याचे निदर्शनास आले. पथकाने बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून बालविवाह थांबविला. जोपर्यंत मुलीचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न लाऊ नये. अन्यथा बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, अशी समज आजी-आजोबांना देण्यात आली.
दरम्यान, गेल्या दीड वर्षात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने पंधरावर बालविवाह थांबविले आहेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईत बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, विनोद शेंडे, साधना ठोंबरे, पोलीस निरीक्षक रुपाली फटींग, मुख्य सेविका दीपाली पवार, सारिका बारापात्रे, स्नेहलता गजभिये, वनिता नंदेश्वर आदी सहभागी होते.