लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पिटेसूर गावात शनिवारी सकाळी बालसंरक्षण पथकाने धडक देत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बालविवाहाचा विधी रोखला. अशा तऱ्हेने पथकाने गेल्या नऊ महिन्यांत नऊ बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. यावेळी अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना समज देत मुलीचा विवाह १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच करण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले.
शनिवारी सकाळी बालसंरक्षण निरीक्षक मुश्ताक पठाण यांना पिटेसूर गावात अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात असल्याची सूचना मिळाली. तत्काळ या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांना देण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार माणकापूर पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे, बालसंरक्षण अधिकारी पठाण, विनोद शेंडे, सुजाता गुल्हाणे, ग्रामविकास अधिकारी इंद्रपाल ढोकणे, सरपंच दीपक राऊत, अंगणवाडीसेविका उमा उईके, सामाजिक कार्यकर्ता सुनील ठाकरे, मोहम्मद हफिज यांचे पथक सकाळी ११.३० वाजता पिटेसूर गावात विवाहस्थळी पोहोचले. घटनास्थळावर नातेवाइकांनी पथकाशी वादविवाद घालण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकाऱ्यांनी नातेवाइकांना १८ वर्षांखालील मुलीचा विवाह बेकायदेशीर असल्याची समज दिली. त्यानंतर कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले.
बालगृहात निवासाची व्यवस्था
बालसंरक्षण पथक पोहोचल्यानंतर विवाह सोहळ्यात सहभागी नातेवाइकांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा विवाह नव्हे तर साक्षगंध पार पडत असल्याचा बनाव करण्यात आला. अल्पवयीन मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिचा विवाह करण्याची शंका उत्पन्न झाल्याने, त्या मुलीची राहण्याची व्यवस्था बालगृहात करण्यात आली आहे.