लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बाल न्याय कायदा-२०१५ व त्यानुसार लागू दत्तक नियम-२०१७ अंतर्गत नातेवाइकाचेही अपत्य दत्तक घेता येते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बुधवारी दिला.
यवतमाळ जिल्हा न्यायालयाने सदर कायदा व नियमांतर्गत केवळ विधी संघर्षग्रस्त, काळजी व संरक्षण करण्याची गरज असलेले, अनाथ व पालकांनी सोडून दिलेले बालकेच दत्तक घेता येतात, अशी भूमिका घेऊन नातेवाइकाचे अपत्य दत्तक घेण्यासाठी दाखल अर्ज फेटाळला होता. नातेवाइकाचे अपत्य दत्तक घेण्याला सदर कायदा व नियमातील तरतुदी लागू होत नसल्याचे त्या आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित पालकांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सदर कायदा व नियमातील तरतुदी तपासल्यानंतर यांतर्गतची दत्तक प्रक्रिया केवळ विधी संघर्षग्रस्त, काळजी व संरक्षण करण्याची गरज असलेले, अनाथ व पालकांनी सोडून दिलेल्या बालकांपुरती मर्यादित करू शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच, जिल्हा न्यायालयाने संबंधित पालकांचा अर्ज फेटाळायला नको होता, असे मत व्यक्त केले.
नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश
यवतमाळ येथील सुमेद व निशा ठमके या दाम्पत्याने त्यांचे वर्धा येथील नातेवाईक मनोज व राजश्री पाटील यांची अल्पवयीन मुलगी दत्तक घेतली आहे. याकरिता त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर नव्याने कायद्यानुसार निर्णय देण्यात यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाला दिले. या प्रकरणात ऍड . फिरदोस मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून तर, ऍड . ईरा खिस्ती यांनी पालकांच्यावतीने बाजू मांडली.