कन्हान : पारशिवनी येथील लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात बालकांचे अधिकार या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयात डेल डिजिटल लिटरेसी प्रोग्राम या काॅम्प्युटर लॅबचे उद्घाटनही करण्यात आले.
या शिबरात विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकारी व त्यांचे संरक्षण तसेच वाहतुकीच्या विविध नियम व कायद्यांची माहिती देण्यात आली. होप फाउंडेशनचे संचालक प्रभुकुमार यांनी डेल डिजिटल लिटरेसी प्रोग्राम या काॅम्प्युटर लॅबचे महत्त्व, कार्य व त्याअंतर्गत राबविल्या जाणारे विविध उपक्रम समजावून सांगितले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण व विनाेद शेंडे यांनी बालकांचे हक्क, त्यासंदर्भतील विविध कायदे व नियम, त्यांचा वापर यावर मार्गदर्शन केले. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव थोरात यांनी बालकांच्या संरक्षणसंबंधीचे कायदे व संवैधानिक बाबींची सविस्तर माहिती दिली. पारशिवनी पोलीस ठाण्याचे पाेलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पलनाटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून वाहतूक नियम व कायद्याची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका राजेश्री उखरे यांच्या मार्गदर्शनात व पर्यवेक्षक एन. जी. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. संचालन एस. झाडे यांनी केले तर देवेंद्र केदार यांनी आभार मानले.