अॅण्ड्रयू हॉवर्ड यांचे आवाहन : ‘पॅसिकॉन-२०१७’ राष्ट्रीय बालअस्थिव्यंग परिषदनागपूर : वाहनांमधील आसन (सीट) हे प्रौढ प्रवाशांच्या आकाराचे असते. सुरक्षेच्या उपाययोजनाही त्यांच्याच सोर्इंच्या असतात. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी वेगळी व्यवस्था राहत नाही. परिणामी, अपघात झाल्यास मोठ्यांच्या तुलनेत लहान मुले लवकर गंभीर जखमी होतात. यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठे असते. म्हणूनच प्रत्येक वाहनांमध्ये लहान मुलांचे आसन व त्यांच्या सुरक्षेची विशेष व्यवस्था असणे आवश्यक आहे. किंबहुना सर्व देशांनी वाहनांमध्ये ‘चाईल्ड सीट्स’ अत्यावश्यक कराव्यात, असे आवाहन, टोरण्टो कॅनडा येथील प्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. अॅण्ड्रयू हॉवर्ड यांनी येथे केले.विदर्भ आॅर्थाेपेडिक असोसिएशनतर्फे पेडियाट्रिक आॅर्थाेपेडिक सोसायटी आॅफ इंडियाच्या २३ व्या ‘पॅसिकॉन-२०१७’ या राष्ट्रीय बालअस्थिव्यंग परिषदेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. परिषदेचे उद्घाटन संस्थेचे आश्रयदाते डॉ. सुधीर बाभुळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी परिषदेचे आयोजक अध्यक्ष डॉ. आर.एम. चांडक, डॉ. सुधीर सोनी व डॉ. अशोक लवंगे, आयोजक सचिव डॉ. विराज शिंगाडे, विदर्भ आर्थाेपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चौधरी, सचिव डॉ. अलंकार रामटेके, पेडियाट्रिक आर्थाेपेडिक सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. वृषा माधुरी, सचिव डॉ. अलारिक आरुजीस आदी उपस्थित होते. डॉ. हॉवर्ड म्हणाले, मागील काही वर्षांत रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण सर्वच देशांत वाढले आहे. या अपघातात लहान मुलांच्या बळीची संख्या मोठी आहे. यावर उपाययोजना करणे आवश्यक असून त्यांच्यासाठी वेगळ्या सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज असल्याचेही ते म्हणाले.(प्रतिनिधी) मुलांच्या अस्थिव्यंगाचे लवकर निदान आवश्यक -डॉ. पिरानीकॅनडा येथील प्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. शफिक पिरानी म्हणाले, लहान मुलांच्या अस्थिव्यंगाचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. कमी वयात पावलांचे व्यंग दूर होऊन जर आधार मिळाला नाही तर ते परावलंबी होतात. दैनंदिन जीवनात काम करताना किंवा वावरताना खूप अडथळे निर्माण होतात, त्यांच्या शारिरीक व मानसिक अवस्थेवर अनेक विपरीत परिणाम होतात व ते निराशमय जीवन जगतात. समाजातदेखील त्यांची सतत अवहेलना होते. म्हणूनच युगांडामध्ये यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, तोच भारतातही सुरू होणे आवश्यक आहे. असे झाल्यास मुलांचे अपंगत्व दूर करणे शक्य होईल.मुलासारखे रुग्णावर उपचार करा : डॉ.झव्हेरीरुग्णावर उपचार करताना तो आपल्या मुलासारखा आहे या भावनेतून उपचार करा, असा सल्ला डॉ. अशोक झव्हेरी यांनी दिला. त्यांनी यावेळी काही उदाहरणेही दिली. ते म्हणाले, यामुळे रुग्ण व डॉक्टरांमध्ये निर्माण होणारे तडे काही प्रमाणात कमी होतील. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात विविध शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. या शिवाय, मी कसे निदान करतो, सतर्कता, माझा वाईट अनुभव आदी विषयांवर तज्ज्ञाची आपले विचार मांडले.
वाहनांमध्ये ‘चाईल्ड सीट्स’ अत्यावश्यक
By admin | Published: January 28, 2017 1:43 AM