लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. या गुन्ह्यात मुलाने जावयासह घरफोडी केली. आरोपीच्या आईने आपल्या घरात दोन खड्डे खोदून त्यात रोकड आणि माैल्यवान चीजवस्तू लपविल्या, तर आरोपी जावयाने पोलिसांना ती माहिती दिली, कहानी पुरी फिल्मी है... ची प्रचिती देणारा घटनाक्रम तपासात उघड झाला आहे. पोलीस उपायुक्त नुरुल हसन यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रप्रस्थनगरात राहणाऱ्या तीमापुरम गुणशंकर रेड्डी यांच्याकडे ८ डिसेंबरला धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी ३० लाख ४७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी प्रारंभी जयताळ्यातील मयूर भास्कर बाभडे (वय २७) आणि विनोद बिसनराव कुमरे (वय ३०, रा. सालई खुर्द, काटोल) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून हिऱ्यांचे सहा तर सोन्याचे पाच नेकलेस आणि तीन सोनसाखळ्या जप्त केल्या. आरोपी कुमरेने चाैकशीत रामा मडावी नामक साथीदाराचा सहभाग असल्याचे सांगितले. कुमरे मडावीचा जावई आहे. मडावी फरार झाला. पोलिसांनी त्याच्या घरी छापा मारला असता तपासणीत झोपडीच्या आत दोन जागी खड्डे केल्याचे दिसून आले. वरची माती उकरून बघितली तेव्हा खड्ड्यात ५३ हजार रुपये आणि ९६ ग्राम सोन्याचे दागिने असा ५ लाख ३३ हजाराचा ऐवज सापडला. तो जप्त करून पोलिसांनी आरोपी मडावीची आई लता दिनेश मडावी (वय ५५) हिला अटक केली. आरोपी रामा मडावीने घरफोडीनंतर त्याच्या हिश्श्याला आलेली रोकड आणि दागिने आई लताला दिले. तिने घरात खड्डे खोदून ते पुरून ठेवल्याचे कबुलीजबाबात सांगितले, अशीही माहिती उपायुक्त हसन यांनी दिली.
तपास पथकाला रिवॉर्ड
अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सोनेगावच्या पोलीस पथकाने या धाडसी घरफोडीचा छडा लावून बराचसा ऐवज जप्त केला. त्यामुळे या तपास पथकाला १० हजाराचा रिवॉर्ड देण्यात येणार आहे.