लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एका चार वर्षीय बालकाने गिळलेले एक रुपयाचे नाणे शुक्रवारी यशस्वी उपचार करून बाहेर काढले. त्यामुळे चिमुकल्याला जीवनदान मिळाले. त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.यश पाटील असे बालकाचे नाव असून तो बैतूल येथील रहिवासी आहे. तीन दिवसांपूर्वी त्याला वडिलाने खाऊ घेण्यासाठी एक रुपया दिला होता. यशने खेळता-खेळता ते एक रुपयाचे नाणे गिळले. पालकांनी नाणे गुदद्वारावाटे बाहेर पडण्याची प्रतीक्षा केली. परंतु, तसे घडले नाही. यशला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात डॉक्टराच्या चमूने एन्डोस्कोपी प्रक्रियेद्वारे बालकाच्या पोटातील नाणे बाहेर काढले. अन्ननलिकेवाटे नाणे बाहेर काढताना ते श्वास नलिकेत पडू नये याची विशेष खबरदारी डॉक्टरांना घ्यावी लागली. तसे होणे बालकासाठी धोकादायक होते. डॉक्टर्सच्या चमूत डॉ. नितीन गायकवाड व इतरांचा समावेश होता.पालकांनी सतत सतर्क राहावेअशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. काही प्रकरणांत मुलांनी गिळलेल्या वस्तू आपोआप बाहेर पडतात तर, काही प्रकरणात शस्त्रक्रिया करावी लागते. अशा घटना घडू नये याकरिता पालकांनी सतत सतर्क राहिले पाहिजे. असे प्रकार मुलांसाठी जीवघेणे ठरू शकतात.- डॉ. सुधीर गुप्ता.
बालकाने गिळलेले एक रुपयाचे नाणे काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:59 AM
सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एका चार वर्षीय बालकाने गिळलेले एक रुपयाचे नाणे शुक्रवारी यशस्वी उपचार करून बाहेर काढले. त्यामुळे चिमुकल्याला जीवनदान मिळाले.
ठळक मुद्देसुपर स्पेशालिटीमध्ये यशस्वी उपचार