लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेळता खेळता घराजवळच्या नाल्यात पडल्याने एका चिमुकल्याचा बुडून करुण अंत झाला. अंशू सोहनलाल खुद्दान असे त्याचे नाव आहे.सोहनलाल खुद्दान त्यांच्या कुटुंबीयांसोबत एमआयडीसीतील जगताप ले-आऊटमध्ये राहतात. ते मोलमजुरी करतात. त्यांना दोन वर्षांचा अंशू नामक मुलगा होता. अंशूचे आजोबा बाजूलाच राहतात. खुद्दान यांच्या घराजवळ उतरत्या भागात एक नाला आहे. रविवारी सायंकाळी अंशूच्या आजोबाने त्याला आपल्या घरी नेले. तेथे त्याला खेळवल्यानंतर बाजारात जायचे आहे म्हणून त्यांनी अंशूला त्याच्या घरी सोडले अन् ते बाजारात निघून गेले. दरम्यान, सायंकाळी ते घरी परतले त्यावेळी अंशूच्या आईवडिलांनी त्यांच्याकडे अंशूबाबत विचारणा केली. त्याला घरी आणून सोडल्यानंतर आपण बाजारात गेलो होतो, असे आजोबाने सांगताच अंशूच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी अंशूची बरीच शोधाशोध केली. शेजाऱ्यांकडे कुठेच तो आढळला नाही. त्यामुळे घरच्यांनी नाल्याकडे जाऊन बघितले असता अंशू नाल्याच्या पाण्यात पडून दिसला. त्याला लगेच वानाडोंगरीच्या शालिनीताई मेघे कॉलेजमध्ये नेण्यात आले. मात्र, अंशूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंशूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.चिमुकल्या अंशूच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंशूला घरात सोडताना त्याच्या आजोबाने घरच्यांना सांगितले नाही. त्यामुळे तो घरी परतल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. दुसरीकडे आजोबा सोडून निघाल्यामुळे त्यांच्या मागेच अंशू धावत निघाला असावा आणि खाली पडून घसरत नाल्यात जाऊन बुडाला असावा, असा अंदाज आहे.
नागपुरात चिमुकला खेळता खेळता नाल्यात बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:23 PM
खेळता खेळता घराजवळच्या नाल्यात पडल्याने एका चिमुकल्याचा बुडून करुण अंत झाला. अंशू सोहनलाल खुद्दान असे त्याचे नाव आहे.
ठळक मुद्देएमआयडीसीत घडली घटना : परिसरात हळहळ