लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत आहे. संक्रमण रोखण्यासाठी नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गुरुवारी पंचशील चौकातील बचपन ग्रो सुपर बाजार, सदर भागातील छावणी येथील पूनम चेंबरमधील डोमेन पिझ्झा हॉटेल व जरीपटका येथील पंकज खादीवाले दुकानाला मनपाचे उपद्रव शोध पथक व पोलिसांनी सील ठोकले. तसेच २५ हजारांचा दंड वसूल केला.
१५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाऊन असून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी १ पर्यंत उघडी ठेवण्याला अनुमती आहे. दुकानात गर्दी होणार नाही. शोशल डिस्टन्स राहील याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात नियम जारी करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पूनम चेंबर येथील डोमेन पिझ्झा हॉटेलला नियमांचे उल्लंघन केल्याने २५ हजारांचा दंड आकारण्यात आला. तसेच हॉटेल सील करण्यात आले.
मंगळवारी एनडीएस पथकाने शहरातील ५८ प्रतिष्ठानांची तपासणी करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १८ प्रतिष्ठानांवर कारवाई केली. १ लाख ६५ हजारांचा दंड आकारण्यात आला. अशी माहिती उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांनी दिली.
.....
५८ प्रतिष्ठानांची तपासणी
आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार, उपद्रव शोध पथकांनी ५८ प्रतिष्ठानांची तपासणी केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून २० हजार दंड वसूल केला. धरमपेठ झोनअंतर्गत सात कार्यालयांची तपासणी करून २५ हजार दंड वसूल केला. हनुमाननगर झोन येथील ६ प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोली झोनअंतर्गत आठ मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करून २० हजार दंड वसूल केला. नेहरूनगर झोनमधील ६ तर गांधी बाग झोनमधील ३ प्रतिष्ठानांची तपासणी करून ३५ हजार दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनमधील दोन प्रतिष्ठानांची करून १५ हजार दंड केला, लकडगंज झोनअंतर्गत नऊ प्रतिष्ठानांची करून १० हजार, आशीनगर झोनमध्ये ७ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, तर मंगळवारी झोनमधील पाच प्रतिष्ठानांची तपासणी करून २५ हजार दंड वसूल केला.