खापरखेडा (नागपूर) : आई व वडिलांचे काेराेनामुळे निधन झाल्याने अनाथ झालेले भाऊ-बहीण त्यांच्या काकांकडे भानेगाव (ता. सावनेर) येथे राहायला आले. मात्र, काका व काकूचा त्रास असह्य झाल्याने दाेघांनीही घर साेडले. तर, खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांच्या पथकाने त्या दाेघांचा शाेध घेत त्यांना नागपूर शहरातील मानकापूर भागातून यशस्वीरीत्या ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मावस भावाच्या ताब्यात दिले.
अंश हरीश झारिया (११) व हंसिका हरीश झारिया (१३) अशी या भाऊ व बहिणीची नावे आहेत. आई-वडिलांच्या निधनानंतर अंश व हंसिका वर्षभरापूर्वी महाराजपूर, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश येथून त्यांच्या उपासे ले आऊट, भानेगाव येथे काकाकडे राहायला आले हाेते. काका व काकूचा त्रास असह्य झाल्याने दाेघांनी घर साेडण्याचा निर्णय घेत मंडला, मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या त्यांच्या आजीकडे जाण्याचे ठरविले हाेते. त्यातच दाेघांनी शुक्रवारी (दि. १०) दुपारी घर साेडले. तेथे जाण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी नागरिकांकडे पैसे मागून ते जमा केले हाेते. याच पैशातून दाेघांनी कामठी शहर गाठले.
कामठी फिरत असताना दाेघेही भानेगाव येथील एका ऑटाेचालकास दिसले. त्याने दाेघांनाही आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यावर त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली. त्या ऑटोचालकाने त्यांच्या गाेव्यात राहणाऱ्या सावत्र भावाला फोन करून माहिती दिली. त्याच्या सांगण्यावरून ऑटाेचालकाने त्या दाेघांनाही त्याच्या मानकापूर, नागपूर येथे राहणाऱ्या मावस भावाकडे साेडून दिले.
घर साेडतेवेळी काका-काकू घरी नव्हते. घरी परत आल्यावर त्यांना दाेघेही घरी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल करून त्या दाेघांचे अपहरण करण्यात आल्याचे पाेलिसांना सांगितले. शिवाय, पाेलिसांनीही तातडीने त्या दाेघांचा शाेध घ्यायला सुरुवात केली. पाेलिसांच्या एका टीमला कामठी शहरात ताे ऑटाेचालक भेटला. त्याच्या माध्यमातून पाेलिसांनी मानकापूर गाठले आणि त्या दाेघांना ताब्यात घेतले. पाेलिसांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दाेघांनाही त्यांच्या मावस भावाच्या स्वाधीन केले.
पैशासाठी छळ
अंश व हंसिका त्यांच्या आई व वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भानेगाव येथील काकांकडे राहायला आले हाेते. दाेघांचाही काेराेनामुळे मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता. घर साेडण्यापूर्वी दाेघांनीही ‘आम्ही घर साेडून जात आहे. तुम्ही खुश राहा’ अशा आशयाचे पत्र लिहून ते दाराच्या कडीत ठेवले हाेते.