निशांत वानखेडे
नागपूर : शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित हा विषय कायमच डाेकेदुखी राहिलेला आहे आणि ही परिस्थिती अद्यापही बदललेली नाही. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ५ वी, ८ वी ते १० वीचे विद्यार्थी गणितात कमजाेर असल्याची बाब समाेर आली आहे. म्हणजे मुलांच्या मानगुटीवर बसलेली गणिताची भीती दूर करण्यात शिक्षक आणि सरकारचे शैक्षणिक धाेरण अपयशी ठरले, असेच म्हणावे लागेल.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या ‘नॅशनल अचीव्हमेंट सर्वेक्षण २०२१’चा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. राज्य सरकारी शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, खासगी शाळांमधील वर्ग ३, ५, ८ व १० वीच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतांचे आकलन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हे सर्वेक्षण करण्यात आले हाेते. देशातील १,१८,२७४ शाळांमध्ये ५,२६,८२४ शिक्षकांच्या सहकार्याने ३४ लाख विद्यार्थ्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. यात दोन लाख फिल्ड इन्व्हेस्टिगेटर, १.२४ ला निरीक्षक, ७३३ जिल्हास्तरीय समन्वयक व नाेडल अधिकाऱ्यांचा समावेश हाेता. महाराष्ट्रातील ७२२६ शाळांमध्ये २,१६,११७ विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे ज्ञान भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक विज्ञान या विषयांवर काही प्रश्नांच्या आधारे तपासण्यात आले.
सर्वेक्षणानुसार राज्यातील विद्यार्थी एकूणच आकलनात हुशार असल्याचे दिसून आले आहेत. त्यातही तिसरी व पाचवीचे विद्यार्थी आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरस असल्याचे दिसते; तर शासकीय शाळांची मुले खासगी शाळांपेक्षा हुशार असल्याचे आढळून आले. मात्र, गणित हा विषय त्यांच्यासाठी कठीणच जात आहे. तिसरीच्या मुलांनी गणितात ५७ टक्के गुण प्राप्त केले; पण वर्ग ५, ८ व १० वीचे विद्यार्थी ५० टक्क्यांच्या खालीच राहिले.
सर्वेक्षणातील महत्त्वाचे बिंदू
- इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर गणितात ५७ टक्के, भाषा विषयात ६२ टक्के, तर पर्यावरण विज्ञान विषयात ५७ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी ३१६ गुण प्राप्त केले.
- इयत्ता पाचवीच्या मुलांनी भाषेत ५५ टक्के, पर्यावरण व विज्ञान विषयात ४८ टक्के, तर गणितात ४४ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २८७ गुण प्राप्त केले.
- इयत्ता आठवीच्या मुलांनी भाषा विषयात ५३ टक्के, तर विज्ञान ३९ टक्के, सामाजिक विज्ञान ३९ टक्के, तर गणित विषयात ३७ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २५० गुण मिळाले.
- इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयात ३५ टक्के, सामाजिक विज्ञान ३७ टक्के, इंग्रजी ४३ टक्के, तर गणितात ३२ टक्के कामगिरी केली. गणितात ५०० पैकी सरासरी २११ गुण प्राप्त केले.