नागपूर : कोरोनातून सावरत नाही तोच काही लहान मुलांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’ (एमआयएस) हा आजार दिसून येत आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात या आजाराचे रुग्ण कमी असलेतरी पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागपूर जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२१ या दरम्यान शून्य ते १९ या वयोगटात ३०४२० रुग्णांची नोंद झाली. यात एकट्या मेडिकलमध्ये जवळपास ४० तर खासगीमध्ये २० असे एकूण ६० वर रुग्णांची नोंद झाली आहे.
‘एमआयएस’ हा आजार कोरोनाशी मिळताजुळता आहे. वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांनी सांगितले, या आजाराच्या मुलांमध्ये पहिले २४ तास ‘हाय ग्रेट फिवर’ राहतो. सोबतच नसा आणि स्रायूंमध्ये सूज येणे, पोट दुखणे, उलट्या, हगवण व पोट फुगणे तसेच पल्स (नाडी) वेगाने चालणे आदी लक्षणे दिसून येतात. याकडे पालकांनी व डॉक्टरांनी लक्ष देणे महत्त्वाचे असते. या आजारावर वेळेत उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. ही लक्षणे इतरही आजारांमध्ये दिसून येत असल्याने गोंधळ उडण्याची शक्यता अधिक असते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) या आजाराला घेऊन ‘अलर्ट’ जारी केला आहे.
-३०,४२० बालकांना कोरोना
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक, दुसऱ्या लाटेत तरुण तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु दुसऱ्या लाटेतील बाधितांमध्ये १९ वर्षांखालील बालकांची संख्या वाढली आहे. जानेवारी महिन्यात ९०३, फेब्रुवारी महिन्यात १७४१, मार्च महिन्यात ६९६६, एप्रिल महिन्यात २०८१० असे एकूण ३०४२० रुग्ण आढळून आले. परंतु याच दरम्यान कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिन्ड्रोम’ दिसून आल्याने चिंता वाढली होती.
गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली
‘एमआयएस’ या आजाराचे मार्च महिन्यापासून रुग्ण आढळून येत होते. मे महिन्यात याची संख्या वाढली होती. परंतु आता रुग्णांची संख्या कमी झाली आहे. विशेषत: ‘लोकमत’ने मे महिन्यात या आजारावर प्रकाश टाकल्याने पालकांमध्ये जनजागृती झाली. यामुळे आता आजाराचे तातडीने निदान होऊन रुग्ण औषधोपचाराखाली येत असल्याने गंभीर रुग्णांची संख्या जून महिन्यात कमी झाली आहे.
-डॉ. वसंत खळतकर, वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ
:: अशी आहेत लक्षणे
पहिल्या २४ तासात तीव्र स्वरूपातील ताप, उलट्या होणे, पोट दुखणे, हगवण, हृदयाचे ठोके वाढणे, अंगावर लाल चट्टे येणे, अशक्तपणा वाटणे, श्वास लागणे, डोके दुखणे, गाठी येणे, चिडचिडेपणा वाढणे, प्लेटलेट कमी होणे आदी लक्षणे दिसून येतात.
:: ही घ्या काळजी
कोरोना होऊन गेल्यानंतर साधारण तिसऱ्या आठवड्यात ताप व इतर लक्षणे दिसून येताच बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घ्या. स्वत:हून औषध घेऊ नका. ‘एमआयएस’ आजाराचे सुरुवातीलाच निदान झाल्यास तो गंभीर होत नाही.
:: जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण-४,७६,८७०
:: कोरोनावर मात केलेले रुग्ण-४,६७,१९०
:: उपचार घेत असलेले रुग्ण-६५८
:: एकूण मृत्यू -९०२२
(ही आकडेवारी २३ जून रोजीची आहे)