लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे जवळपास नऊ महिन्यापासून बंद असलेले महाराजबाग प्राणिसंग्रहालय आता उघडले गेले आहे. त्यामुळे एवढे दिवस अंगणातच खेळणारी मुले आता महाराजबागेच्या हिरवळीवर उत्साहाने बागडताना दिसायला लागली आहेत. अर्थात, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करूनच येथे प्रवेश दिला जात आहे.
यासंदर्भात महाराजबागचे प्रभारी अधिकारी डॉ. बावस्कर म्हणाले, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाऱ्या निर्देशानुसारच कोरोना नियमाचे पालन करून प्राणिसंग्रहालय खुले करण्यात आले आहे. येणाऱ्यांकडून प्रवेश शुल्क डिजिटल माध्यमातून स्वीकारले जात आहे. प्रवेशद्वारावरच थर्मामीटरने तापमान तपासले जाते, त्यानंतर नोंद करूनच सर्वांना आत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रजिस्टरमध्ये येणाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक आदी माहिती नोंदविली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी दुपारी महाराजबागमध्ये मुलांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. बऱ्याच कालावधीनंतर ही मुले येथे आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.